गुगल मॅपवरुन LOC काढून टाकण्यात आली आहे का? वाचा सत्य

Partly False सामाजिक

भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (LOC) न दाखविलेला गुगलवरील नकाशा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या नकाशासोबत दावा करण्यात येत आहे की, गुगल मॅपने नियंत्रण रेषा (LOC) पुसली. गुगलने खरोखरच त्यांच्या नकाशावरुन नियंत्रण रेषा पुसली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

loc-1.png

फेसबुक | फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

भारताच्या नकाशातून गुगलने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा खरोखरच काढून टाकली आहे का, याचा शोध घेतला असता, द वॉशिग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील एक लेख आढळला. त्यानुसार, तुम्ही ज्या देशातून गुगलवरील नकाशा पाहता त्यानुसार सीमा दर्शविल्या जातात. म्हणजे एखाद्या सीमेवरून जर दोन देशांमध्ये वाद असेल तर, तुम्ही कोणत्या देशातून गुगल मॅप वापरता त्यानुसार नकाशा दाखवला जातो. याबाबत त्यांनी तयार केलेला एक व्हिडियोदेखील आपण खाली पाहू शकता.

Archive 

या वृत्तात भारतातून दिसणारा गुगल मॅपमधील नकाशा आणि परदेशातून दिसणारा गुगल मॅपवरील नकाशा याची तुलना करण्यात आली आहे. जसे की तुम्ही पाहू शकता की, भारतातून गुगल मॅपमध्ये LOC दिसत नाही. कारण संपूर्ण काश्मीर हा भारताचाच भाग आहे, अशी भारताची भूमिका आहे. त्यामुळे भारतातून गुगल मॅपमध्ये पाकव्याप्त काश्मीर निर्देशीत करणारी सीमा (LOC) दाखवली जात नाही.

परंतु, भारताबाहेरून जर गुगल मॅप पाहिला तर LOC सीमा दाखवली जाते.

LOC.png

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने द हिंदू या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 15 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेल्या वृत्तात गुगलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, त्या त्या देशाच्या तेथील सरकारच्या भूमिकेनुसार आणि कायद्यानुसार गुगल आपल्या नकाशात बदल करते. 

निष्कर्ष  

गुगलने आपल्या नकाशातून नियंत्रण रेषा काढून टाकलेली नाही. भारतातून नकाशा पाहिल्यास ही नियंत्रण रेषा दिसत नाही. परंतु परदेशातून ही नियंत्रण रेषा दिसते. त्यामुळे गुगल मॅप्सवरुन नियंत्रण रेषा काढून टाकण्यात आली ही बाब अर्धसत्य आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:गुगल मॅपवरुन LOC काढून टाकण्यात आली आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False