औरंगाबादमध्ये 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला नाही. पोलीस अधीक्षकांचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

Coronavirus False

औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्यावर गेला असून, दिवसेंदिवस नवीन रुग्णांची भर पडत आहे. रेड झोन बनलेल्या औरंगाबाद शहरात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. अशातच पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, औरंगाबाद शहरात 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडियो जुना आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

मोक्षदा पाटील यांचा नागरिकांना आवाहन करतानाचा एक व्हिडियो शेयर करण्यात येत आहे. व्हिडियोमध्ये मोक्षदा पाटील म्हणतात की, “30 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, नागरिकांनी यापूर्वी जसे पोलिसांना सहकार्य केले तसेच कायम राखावे. अत्यावश्यक वस्तूंची सोय करावी.”

युजरने कॅप्शनमध्ये म्हटले की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. मोक्षदा पाटील मॅडम यांनी जनतेला आव्हान केले आहे की 30 मेपर्यतं लॉकडाऊनमध्ये वाढ.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

याविषयी शोध घेतला असता कळाले की, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण कार्यलयातर्फे सदरील व्हिडियो 14 एप्रिल रोजी जारी करण्यात आला होता. पहिला लॉकडाऊनंतर दुसरा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोक्षदा पाटील यांनी नागरिकांना आवाहन करणारा व्हिडियो प्रसिद्ध केला होता.

यामध्ये त्या जी 30 तारीख म्हणत आहेत, ती 30 एप्रिल आहे. हा जुना व्हिडियो आता शेयर करून 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला असा चुकीचा प्रचार केला जात आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – औरंगाबाद ग्रामीण अधीक्षक कार्यलय फेसबुक

हा जुना व्हिडियो चुकीच्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयाकडून खुलासा करण्यात आला की, औरंगाबादमध्ये लॉकडाऊन 30 मेपर्यंत वाढविण्यात आल्याचा दावा खोटा आहे. मोक्षदा पाटील यांचा तो व्हिडियो जुना असून, त्या 14 ते 30 एप्रिलदरम्यानच्या लॉकडाऊनसंदर्भात बोलत होत्या.

मोक्षदा पाटील यांनी व्हिडियोद्वारेदेखील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. “आज जो व्हिडियो व्हायरल झाला तो 13 एप्रिल रोजीचा आहे. तो मे महिन्यासाठी नव्हता. त्या व्हिडियोद्वारे चुकीची माहिती पसरविणाऱ्यांचा आम्ही शोध घेत असून, त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांना कोणतीही शंका असल्यास त्यांनी अधीक्षक कार्यलायशी संपर्क साधावा,” असे त्यांनी आवाहन केले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, औरंगाबादमध्ये 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घोषणा केलेली नाही. त्यांचा तो व्हिडियो एप्रिल महिन्यातील असून, 14 ते 30 एप्रिल दरम्यानच्या लॉकडाऊनविषयीचा तो व्हिडियो आहे. जुन्या व्हिडियोचा चुकीचा अर्थ लावण्यात येते आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.) 

Avatar

Title:औरंगाबादमध्ये 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला नाही. पोलीस अधीक्षकांचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False