
महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणअंती कळाले की, केरळमधील हा जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होत आहे. ना हा व्हिडिओ बारामतीचा आहे, ना त्यात भाजप आमदार किंवा मुस्लिम तरुण मार खात आहे.
काय आहे दावा?
दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये महिलांचा एक घोळका एका व्यक्तीला फरफटत कपडे फाडेपर्यंत मारत असल्याचे दिसते.
दावा क्र. 1: कॅप्शनमध्ये म्हटले की, हिंदू मुली आता जागृत झाल्यात. त्यामुळे यापुढे यांच्यावर जोर जबरदस्ती होईल. बारामती ला झालेला प्रकार परत होऊ नये.
मूळ पोस्ट – फेसबुक
दावा क्र. 2: कॅप्शनमध्ये म्हटले की, “केरळचे बीजेपीचे आमदार यांना महिला मारतानाचा हा व्हिडिओ..असा मेसेज फिरतोय हा खराय का खोटाय..काय माहीत नाही. पण उघडा नागडा महिला मारतायत.”

दावा क्र. 3: कॅप्शनमध्ये म्हटले की, “केरळमध्ये असभ्य वर्तन करण्याऱ्या मुस्लिम तरुणाला हिंदु महिलांनी चोख प्रत्युत्र दिले.”
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडिओ फ्रेमवर गुगल रिव्हर्स इमेजद्वारे शोध घेतला. त्यातून कळाले की, जानेवारी महिन्यापासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.
ईटीव्हीच्या सात जानेवारीच्या बातमीनुसार, हा व्हिडिओ केरळमधील मुरियद (जि. त्रिसुर) गावात 59 महिलांनी एका व्यक्तीला केलेल्या मारहाणीचा आहे. एका महिलेचे फोटो आक्षेपार्हरीत्या एटिड केल्याचा आरोप करीत या महिलांनी शाजी नामक व्यक्तीवर हल्ला केला होता.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अनेक आरोपी महिलांना अटक केली होती.

मूळ बातमी – ईटीव्ही
काय होता नेमका प्रकार?
बातम्या आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरियद गावात एम्परर इमॅन्युएल चर्चचे आध्यात्मिक केंद्र आहे. आरोपी महिला आणि पीडित शाजी हे या चर्चशी संलग्नित आहेत.
काही दिवसांपूर्वी शाजीने या आध्यात्मिक केंद्रापासून संबंध तोडले होते. तसेच केंद्रातील एका महिलेचे फोटो त्याने मॉर्फ केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
5 जानेवारी रोजी शाजी आपल्या कुटुंबासह कारमधून जात असताना 59 महिलांच्या जमावाने हल्ला करीत त्याला मारहाण केली होती.
व्हिडिओसोबत फेक दावे
या प्रकरणी अलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तपास अधिकारी सिबीन एम. बी. यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी सांगितले की, मारहाण झालेला व्यक्ती ना मुस्लिम आणि ना तो भाजप आमदार आहे. या प्रकरणामध्ये कोणतेही सांप्रदायिक कारण नाही. मारहाण करणाऱ्या महिला आणि मारहाण झालेला व्यक्ती दोघेही स्थानिक चर्चशी निगडीत आहेत. दोन धार्मिक गटातील हे भांडण नव्हते.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा आहे. तसेच हा व्हिडिओ हिंदु महिलांनी मुस्लिम तरुणाला चोप दिल्याचादेखील नाही. केरळमधील एका स्थानिक चर्चमधील महिलांनी दुसऱ्या सदस्य पुरुषाला मारहाण केली होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य
Written By: Agastya DeokarResult: False
