
5 गोल्ड मेडल मिळवलेल्या हीमा दासने सचिन ची मुंबई येथे भेट घेतली..आता नाही बोलणार का Nice pic अशी पोस्ट Aarohi Patil यांनी गेले ते दिवस राहिल्या त्या, फक्त आठवणी या पेजवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची भेट घेतल्याच्या या पोस्टवर Sampada Sawant यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कधी भेट घेतली ती अजुन बाहेरच आहे. त्यामुळे हे छायाचित्र कधीचे आणि खरे आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. संपदा सावंत यांची ही प्रतिक्रिया आपण खाली पाहू शकता.
त्यानंतर आम्ही हिमा दास आणि सचिन तेंडूलकर यांचे हे छायाचित्र गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम आमच्यासमोर आला.
अपेक्षित परिणाम न मिळाल्याने आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला. या ठिकाणी हिमा दासने घेतली सचिनची भेट असा शब्दप्रयोग करुन या भेटीची काही माहिती मिळते का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम दिसून आला.
महाराष्ट्र टाईम्सने 22 जुलै 2019 रोजी देण्यात आलेल्या वृत्तात सचिन तेंडूलकरच्या ट्विटने हिमा दास भारवल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आम्ही हिमा दासच्या ट्विटर खात्यास भेट दिली. या ठिकाणी हिमा दासने सचिन तेंडूलकरच्या अभिनंदनाच्या ट्विटला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या ठिकाणी हिमानं सचिनच्या ट्विटला उत्तरही दिलंय. मी मायदेशात परतल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन तुमचे आशीर्वाद घेईल, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याआधी तिने ‘आज माझं स्वप्न पूर्ण झालं. माझे प्रेरणास्थान आणि क्रिकेटच्या देवानं मला फोन करून शुभेच्छा दिल्या. थँक यू सर…तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद,’ असं म्हटल्याचेही दिसून येते.
त्यानंतर हिमा दास मुंबईत दाखल असा शब्दप्रयोग करत आम्ही शोध घेतला त्यावेळी दैनिक सकाळचे हिमासमोर यशाबरोबर आव्हान वेळ सुधारण्याचे असे 23 जुलै 2019 चे वृत्त दिसून आले. या वृत्तात हिमाच्या कामगिरीचे आणि यशाचे विश्लेषण करण्यात आले आहे. युरोपातील दौरा आटोपून ती भारतात दाखल होईल, असे या वृत्तात स्पष्ट म्हटले आहे.
त्यानंतर आम्ही hima das meets sachin tendulkar असा शब्दप्रयोग करत छायाचित्रे शोधली. यात लेटेस्ट ली या संकेतस्थळावरील 30 सप्टेंबर 2018 रोजी देण्यात आलेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात हिमा दास हिने सचिन तेंडूलकरची भेट घेतल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ हिमा दास हिने सचिन तेंडूलकरची एक वर्षापूर्वी भेट घेतल्याचे दिसत आहे.
हिमा दास हिच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावरही 28 सप्टेंबर 2018 रोजी ही छायाचित्रे दिसून येतात.
नॉर्थ इस्ट नाऊ या संकेतस्थळाने हे वृत्त 29 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिध्द केल्याचे आपल्याला दिसून येते.
इन्स्टाग्राम वेब व्ह्यूवर webstagram वरही 29 सप्टेंबर 2018 रोजी हे फोटो अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. आपण हे फोटो खाली पाहू शकता.
निष्कर्ष
हिमा दासने सचिन तेंडूलकरची गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भेट घेतली होती.
हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची मुंबईत भेट घेतल्याचे असत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची मुंबईत भेट घेतली का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
