
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये सुविधांची कमतरता ही गंभीर समस्या आहे. भारतात अनेक खेड्यापाड्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आहे. हे जळजळीत सत्य दाखवणारे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे एका मृत महिलेचे हात-पाय तोडून तिचे शव पोत्यात भरून दोघेजण घेऊन जाताना दिसतात. दावा करण्यात येत आहे की, हे फोटो दक्षिणेतील कम्युनिस्ट राज्यातील असून, ते दोघे पिता-पुत्र आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
फेसबुक पोस्टमध्ये दोन फोटो दिलेले आहेत. पहिल्या फोटोत एक व्यक्ती स्ट्रेचरवर उभा राहून एका वृद्ध महिलेच्या कमरेवर पाय ठेवून हातात पाय घेऊन मोडताना दिसतो. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीसुद्धा आहे. दुसऱ्या फोटोत हे दोघे एका पांढऱ्या पोत्याला बांधत आहेत.
पोस्टमध्ये लिहिले की, दक्षिणेकडिल सुशिक्षित, सुज्ञ लोकांचे आणि तिकडच्या कम्युनिस्ट सरकारचे गोडवे गाण्याआधी, हि हृदयद्रावक परिस्थिती पाहा. शव वाहून न्यायला रुग्णवाहिका नसल्यामुळे हात-पाय मोडून पोत्यात टाकून म्हातारीचं शव घरी नेताना मुलगा आणि त्याचा बाप.
तथ्य पडताळणी
दक्षिणेतील कम्युनिस्ट राज्य असा पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. दक्षिण भारतामध्ये फक्त केरळ राज्यामध्ये कम्युनिस्ट सरकार आहे. तेथे लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (डावी लोकशाही आघाडी) सत्तेत आहे. याचा अर्थ पोस्टमध्ये दोन प्रमुख दावे करण्यात आले आहेतः
1. सदरील फोटो केरळमधील आहे
2. फोटोत दिसणारे दोघे पिता-पुत्र आहेत

फोटोंची सत्यता पडताळणीसाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून तीन वर्षांपूर्वीच्या बातम्या समोर आल्यात. एनडीटीव्ही वेबसाईटवर 27 ऑगस्ट 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हे फोटो ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील सोरो येथील आहे.
मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्ही । अर्काइव्ह
सालमनी बेहरा नामक एक वृद्ध महिलेला रेल्वेने धडक दिली होती. त्यानंतर तिला येथील एका स्वास्थ्य केंद्रात भरती करण्यात आले. तिचा मृत्यू झाल्यानंतर पोस्ट मॉर्टम करण्यासाठी तिला 30 किमी दूर असणाऱ्या दवाखान्यात रेल्वेने न्यावे लागणार होते. परंतु, तेथे रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. तसेच रिक्षावाल्याला द्यायला मृताच्या मुलाकडे पैसे नव्हते. दरम्यान, मृत महिलेचे शरीर ताठरले होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी शवाचे हात-पाय तोडून ते पोत्यात भरले व रेल्वेस्टेशनवर नेले.
वरील बातमीत स्पष्ट म्हटले आहे की, स्वास्थ्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहाची हातपाय तोडले होते. स्ट्रेचरवर जो व्यक्ती चढलेला आहे तो, कर्मचारी आहे. न्यूज-18 वेबसाईटवरील बातमीतही ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच हे कर्मचारी जेव्हा शवाचे हात-पाय तोडत होते तेव्हा तेथे मृत महिलेचा मुलगा उपस्थित होता. त्याने हात-पाय तोडले नाहीत.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज-18 । अर्काइव्ह
वन इंडियाच्या हिंदी न्यूज वेबसाईटवर 27 ऑगस्ट 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीत सदरील फोटो वापरण्यात आले आहेत. त्यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, या फोटोत स्वास्थ्य कर्मचारी केंद्रातील कर्मचारी पोत्यात मृतदेह भरत आहेत. म्हणजे फोटोत दिसणारे हे दोघे जण मृताचा पती आणि मुलगा नाही. ते कर्मचारी आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – वन इंडिया । अर्काइव्ह
या घटनेवरून बरेच वादळ उठले होते. ओडिशाच्या मानवाधिकार आयोगाने या आरोग्य केंद्राची चौकशी सुरू केली होती. इंडियन एक्सप्रेसने याविषयी व्हिडियो न्यूज रिपोर्टदेखील तयार केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
वरील पुराव्यावरून सिद्ध होते की, सदरील फोटो केरळ किंवा दक्षिणेतील कम्युनिस्ट राज्यातील नाही. तो ओडिशातील आहेत. ही घटना 2016 मध्ये घडली होती. तसेच फोटोत दिसणारे दोघेजण पिता-पुत्र नसून, ते स्वास्थ्य केंद्रातील कर्मचारी आहेत.

Title:अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे शवाचे हात-पाय तोडण्याचे फोटो ओडिशातील आहे. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
