मदरशांमध्ये मुलींना हिंदु धर्माविरोधात शिकवणाऱ्या शिक्षकाचा फोटो खोटा आहे. वाचा सत्य

False सामाजिक

हिंदु धर्मातील योग, जानवं, मंगळसुत्र यांच्याऐवजी मुस्लिम मुलींनी इस्लाम धर्मातील हलाला, सुंता आणि बुरखापद्धतीचा अवलंब केला पाहिजे, अशी मदरशांमध्ये शिकवण दिली जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पुरावा म्हणून मदरशातील एका वर्गाचा फोटो शेयर केला आहे. यामध्ये फळ्यावर हिंदु आणि इस्लाम धर्मातील प्रथांची तुलना केलेली दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटो तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

‘वास्तविक भारत’ नावाच्या फेसुबक पेजने 22 जून, 2019 रोजी मदरशातील एका वर्गाचा फोटो शेयर केला आहे. फोटोत एक मुस्लिम शिक्षक काही मुलींना शिकवताना दिसतो. फळ्यावर हिंदू आणि इस्लाम असे दोन रकाने करण्यात आले आहेत. हिंदु नावाच्या रकान्यातील योग, जानवं आणि मंगळसुत्र यांच्यासमोर नकारात्मक फुली मारलेली आहे. सोबत इस्लामच्या रकान्यात हलाला, सुंता आणि बुरखा पद्धतीला योग्य म्हणून फुली मारलेली आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहिले की, पढ़ाई जोरों पर है। ऐसे ही थोड़े कोई आतंकवादी बनता है।

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोची सत्यता प्रस्थापित करण्यासाठी गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून प्रिंट वेबसाईटवर सदरील फोटोसंदर्भात असेलेली 6 नोव्हेंर 2018 रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार, वादग्रस्त लेखक तारेक फताह यांनी हा फोटो शेयर करून म्हटले होते की, मदरशातील हा शिक्षक मुस्लिम मुलींना इस्लाम धर्म कसा हिंदु धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, असे शिकवत आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे ट्विट नंतर डिलीट केले.

बातमीत सांगितले की, मूळ फोटो उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथील दारुल उलूम हुसैनिया मदरशातील आहे. या मदरशात संस्कृत शिकवली जाते. येथील मूळ फोटोशी छेडछाड करून सदरील वादग्रस्त छायाचित्र तयार करण्यात आले होते. 

मूळ बातमी येथे वाचा – द प्रिंटअर्काइव्ह

एनडीटीव्हीच्या 11 एप्रिल 2018 बातमीनुसार, उत्तर प्रदेश बोर्डाअंतर्गत येणाऱ्या या मदरशात अरबी, इंग्लिश आणि संस्कृत शिकविली जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, संस्कृत शिकवायला येथे एका मुस्लिम शिक्षकाचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली. बातमीमध्ये एएनआय वृत्तसंस्थेच्या सौजन्याने मदरशातील विविध फोटो दिलेले आहे. व्हायरल फोटोचा मूळ फोटोसुद्धा येथे दिलेला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

एएनआयने या मदरशातील विविध फोटो ट्विट केलेले आहेत. 9 एप्रिल 2018 रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, दारुल उलूम हुसैनिया मदरशामध्ये आता संस्कृत भाषा शिकविण्यात येत आहे. मदरशाच्या प्रमुखांनी सांगितले की, हा आधुनिक मदरसा आहे. यूपी बोर्डाअंतर्गत येणाऱ्या आमच्या संस्थेत इंग्लिश, हिंदी, सायन्स, गणित आणि संस्कृत शिकवले जाते. विद्यार्थ्यांना अरेबिकदेखील विषय आहे.

अर्काइव्ह

एएनआयचा मूळ फोटो आणि फेसबुक पोस्टमधील फोटो यांची तुलना केल्यावर लक्षात येते की, मूळ फोटोतील फळ्यावरील मजकूर एडिट करून फोटोशॉपद्वारे तेथे हिंदु-इस्लाम वादग्रस्त मजकूर दाखवण्यात आला. मूळ फोटोमध्ये फळ्यावर पुढील संस्कृत श्लोक आहेः

भविष्यामि धीरो भविष्यामि वीरः ।
भविष्यामि दानी स्वदेशभिमानि ।।
भविष्याम्हं सर्वदोत्साहयुक्तः ।
भविष्यामि चालस्ययुक्तो न वाहम् ।।

निष्कर्ष

मदरशांमध्ये मुस्लिम मुलींना हिंदु धर्मातील प्रथांपेक्षा इस्लाम धर्मातील प्रथा कशा चांगल्या हे शिकवताना दाखवणारा फोटो खोटा आहे. गोरखपूर येथील दारुल उलूम हुसैनिया मदरशातील मूळ छायाचित्राला फोटोशॉपमध्ये एडिट करून, असा वादग्रस्त फोटो तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:मदरशांमध्ये मुलींना हिंदु धर्माविरोधात शिकवणाऱ्या शिक्षकाचा फोटो खोटा आहे. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False