
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राहुल गांधी मंचावर नमाज अदा करत असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीत आढळले कि, व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी नमाज अदा करत नव्हते, तर ते केरळमधील पारंपरिक युद्धकला ‘कलारीपयट्टू’मधील नमस्कार करत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी काही लोकांसोबत हात जोडून वाकताना आणि आदर व्यक्त करताना दिसतात.
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहित आहेत : “केरळ सरकार आणि राहुल गांधी नमाज अदा करताना.”
फॅक्ट-चेक
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 महिन्यांपूर्वीचा आहे.
‘CNBC TV-18’ या वृत्तसंस्थेने 6 मार्च 2026 रोजी हा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते : “राहुल गांधी यांनी मरियन कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत प्राचीन मार्शल आर्ट ‘कलारीपयट्टू’चा अनुभव घेतला.”
याबाबत अधिक शोध घेतल्यावर समजले की, केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी राज्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान 6 मार्च 2026 रोजी इडुक्की जिल्ह्यातील मरियन कॉलेज, कुट्टिक्कनम येथे विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राहुल गांधी यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल आणि डीन कुरियाकोस यांच्यासह त्यांनी केरळची पारंपरिक युद्धकला ‘कलारीपयट्टू’मधील नमस्कार केला होता. अधिक माहिती येथे, येथे व येथे वाचता येईल.
‘द हिंदू’ने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते.
तसेच हा व्हिडिओ राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवरदेखील उपलब्ध आहे.
निष्कर्ष
पडताळणीतून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी नमाज अदा करत नव्हते. ते केरळमधील पारंपरिक युद्धकला ‘कलारीपयट्टू’मधील नमस्कार करत होते. त्यामुळे भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे..
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


