उस्मानाबाद सिविलमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण असल्याचा एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा लोगो असलेले एक ग्राफिक सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. उस्मानाबादमध्ये खरोखरच कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आहे का? त्याला उस्मानाबाद सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे का? एबीपी न्यूजने असे वृत्त दिले आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. सुमित उगले यांनी हे ग्राफिक पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

ABP News Claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

उस्मानाबादमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण असल्याचे वृत्त एबीपी समुहाच्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. उस्मानाबादमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला का, याचाही आम्ही शोध घेतला. त्यावेळी टाईम्स नाऊ मराठीने दिलेले कोरोना व्हायरसबद्दल अफवा पसरवणाऱ्यावर राज्यात पहिला गुन्हा दाखल हे वृत्त आम्हाला दिसून आले. एका व्यक्तीनं एका मराठी वृत्तवाहिनीचा फोटो वापरुन उस्मानाबादमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला असल्याचा फोटो व्हायरल केला होता. वृत्तवाहिनीचा लोगो असल्यानं लोकांनी या फोटोवर विश्वास ठेवला होता. मात्र या प्रकरणी उस्मानाबादचे शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत, असे या वृत्तात म्हटलं आहे.

osmanabad news.png

टाईम्स नाऊ मराठी / Archive

उस्मानाबाद येथील पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी याबाबत दिलेली माहिती आपण खाली पाहू शकता.

https://twitter.com/timesnowmarathi/status/1237307934473781248

उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी याबाबत दिलेली माहितीही आपण खाली पाहू शकता.

https://twitter.com/timesnowmarathi/status/1237307830912176129

एबीपी माझानेही त्यांचा लोगो वापरुन तयार करण्यात आलेले हे टेम्पलेट व्हायरल झाल्यावर या वृत्ताचा इन्कार करत ही अफवा असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. ते आपण खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=FBF-1Ga4_cc

निष्कर्ष

उस्मानाबादमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला हे असत्य आहे. एबीपी न्यूजचे ग्राफिक वापरुन अफवा पसरविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Avatar

Title:‘एबीपी न्यूज’चा लोगो वापरून उस्मानाबादमध्ये कोरोनासंदर्भात अफवा

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False