
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे भेसळखोरी, बेकायदेशीर गुटखा आणि औषधी विक्रिवर केलेल्या कारवाईमुळे सध्या चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुकाराम मुंढे सांगतात की, “मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 2017 पासून मध्यमांवर उपलब्ध आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुकराम मुंढे म्हणतात की, “मला धमकीचे चौथे पत्र आलेल असून त्यामध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची उध्वस्त करण्याची भाषा वापरली आहे. मी तक्रार नोंदवली असून चौकशी सुरू आहे. आरोपी पकडल्या गेल्यावर त्याला योग्य शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. मला फक्त एक सांगायच आहे की, कोणी माला धमक्या देऊन माझ्या निर्णयात बदल करू इच्छित असेल तर को कदापी यशस्वी होणार नाही. मला पुरेशी सुरक्षा मिळाली असून मी व माझे कुटूंब काळजी घेत आहोत. परंतु, धमकी हा प्रकार चुकीचा असून अशा लोकांनी माझा इतिहास तपासावा मग धमकवण्याचा प्रयत्न करावा. “
तसेच व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये “जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना तुकाराम मुंडेंचे सडेतोड उत्तर; मी घाबरणार नाही” असे लिहिले आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी; मुंडेंची खणखणीत प्रतिक्रिया! “धमक्यांना घाबरणारा मी नाही. जनतेच्या हितासाठी आणि सत्याच्या बाजूने उभा राहणारच,” अशा शब्दांत तुकाराम मुंडे यांनी धमकी देणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मुंडेंना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होत आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे.
‘एबीपी माझा’ने युट्यूबवर 28 सप्टेंबर 2017 रोजी एक बातमी शेअर केली होती, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पुणे : धमक्यांना घाबरुन कोणताही निर्णय बदलणार नाही – तुकाराम मुंढे.”
त्यावेळी तुकाराम मुंढे पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेडच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते.
धमकीनंतर कारवाई
जेव्हा तुकाराम मुंढे यांना एका पत्राद्वारे मुंढेंना ही धमकी देण्यात आली, तेव्हा मुंढेंनी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली होती. हे पत्र भुजंगराव मोहिते ( रा. सुखसागर नगर, पुणे ) यानी पीएमपीमध्ये तुम्ही केलेली भाडेवाढ संबंधित असंतोष दाखवत लिहिलेले होते.
अधिक महिती येथे वाचू शकता.
खंडन
व्हायरल व्हिडिओचीदखल घेत पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढेंना प्रश्न विचारला असता त्यांनी या दाव्याचे खंडन केले. ते म्हणाले की, मला कोणीही धमकी दिलेलेली नाही. व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून मी पुणेच्या पीएमपीएमएलमध्ये कार्यरत असतानाचा आहे.
महाराष्ट्र टाइम्स, लोकमत आणि एबीपी माझा या न्यूज संस्थांनी 12 जून रोजी आपल्या युट्यूब चॅनलवर या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले होते.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. 2017 मध्ये पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेडचे अध्यक्ष असताना तुकाराम मुंढेंना धमकीचे पत्र पाठवण्यात आली होते. भ्रामक दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


