
मुंबईतील हाजी अली दर्गा परिसरात एका हिंदू तरुणाच्या हातावर ‘जय श्री राम’चा टॅटू असल्यामुळे तीन मुस्लिम व्यक्तींनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.
तपासाअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओ जुना असून या घटनेत कोणाचीही हत्या झालेली नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही व्यक्तींमध्ये मारामारी होताना दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स असा दावा करत आहेत की, “मुंबईतील हाजी अली दर्ग्याबाहेर एका हिंदू तरुणाच्या हातावर ‘जय श्री राम’चा टॅटू पाहून तीन इस्लामी तरुणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यानंतर या घटनेत कोणताही खून झालेला नसल्याचे आढळले.
या दाव्याबाबत मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर 11 जून 2026 रोजी करण्यात आलेली पोस्ट आढळली.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ताडदेव पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी केली असता हा व्हिडिओ मे 2025 मधील असल्याचे निष्पन्न झाले. एका पर्यटकाचा आणि सुरक्षारक्षकांचा वाद झाल्यानंतर ही घटना घडली होती. या घटनेत कोणाचाही खून झाला नव्हता. त्यामुळे व्हिडिओसोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
ताडदेव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, “व्हायरल व्हिडिओसोबत करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. मे 2025 मधील या घटनेत भरतीच्या वेळेत काही पर्यटक आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणात कोणतीही हत्या झालेली नाही. तसेच घटनेत सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ हाजी अली दर्गा परिसरातील असला तरी त्यामध्ये कोणत्याही हिंदू तरुणाची हत्या झालेली नाही. हा व्हिडिओ गेल्यावर्षी म्हणजे मे 2025 मध्ये काही पर्यटक आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या वादाचा आहे. मात्र, त्याला सांप्रदायिक रंग देत खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


