
सोशल मीडियावर सध्या पोलिस गणवेश परिधान केलेल्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये ही महिला पोलिस चौकीसारख्या ठिकाणी रील बनवताना दिसते. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर करत संबंधित महिला कर्तव्यावर असलेली पोलिस अधिकारी असल्याचा दावा केला आहे.
या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी तो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांक (9049053770) वर पाठवला.
आमच्या तपासात व्हायरल दावा चुकीचा असल्याचे समोर आले. व्हिडिओतील महिला पोलिस अधिकारी नसून ती एक अभिनेत्री आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस गणवेशातील महिला मोबाईल कॅमेऱ्यासमोर रील शूट करताना दिसते.
हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “पोलिस महिला अधिकाऱ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.”
यामुळे अनेकांनी संबंधित महिला खऱ्या अर्थाने पोलिस सेवेत कार्यरत असल्याचे मानले.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्चमधून ‘विशेष वीथ दिनेश’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर 20 जून 2026 रोजी शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ आढळला.
या व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपमधील तीच महिला दिसते. तिच्यासोबत दिनेश सिंधवदेखील उपस्थित आहेत. या मुलाखतीत संबंधित महिला स्वतःची ओळख गुजराती अभिनेत्री हर्षिदा पंखानिया अशी करून देते
मुलाखतीदरम्यान हर्षिदा पंखानिया यांनी स्पष्ट सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला त्या स्वतः आहेत. त्या “गडबड थई गई यार” या गुजराती चित्रपटात अलका परमार नावाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिस गणवेश परिधान केला होता.
त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्या वास्तविक जीवनात पोलिस अधिकारी नसून गुजराती चित्रपटसृष्टीत कार्यरत अभिनेत्री आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हर्षिदा पंखानिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही याबाबत स्पष्टीकरण दिले.
त्यांनी म्हटले की, त्यांचा पोलिस गणवेशाचा किंवा पोलिस दलाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. उलट त्यांना गुजरात पोलिसांच्या कार्याचा आणि त्यांच्या मेहनतीचा आदर आहे.
तसेच त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेकॉर्ड करण्यात आलेले अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यातून त्या एका चित्रपटातील पोलिस पात्र साकारत असल्याचे स्पष्ट होते.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम
निष्कर्ष
तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. सोशल मीडियावर पोलिस अधिकारी म्हणून दाखवली जात असलेली महिला प्रत्यक्षात गुजराती अभिनेत्री हर्षिदा पंखानिया आहे. व्हायरल व्हिडिओ हा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शूट करण्यात आला होता. त्यामुळे कर्तव्यावर असलेली महिला पोलिस अधिकारी रील बनवत होती, हा दावा भ्रामक आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


