सुमारे एक वर्षाच्या विश्रामानंतर कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचा बीएफ-7 सब-व्हेरिएंट तर सिंगापुरमध्ये XBB सब-व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही कोरोना लाटेचा संभाव्य धोका ओळखता खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियावर या नव्या व्हेरिएंटविषयी एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा करण्यात येत आहे की, XBB सब-व्हेरिएंट आधीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाचपट जास्त धोकादायक असून, मृत्यूदर त्यापेक्षा जास्त आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हे दावे निराधार असल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, “COVID-Omicron XBB हा आधीच्या डेल्टा प्रकारापेक्षा 5 पट जास्त विषाणूजन्य आहे आणि मृत्यू दर त्यापेक्षा जास्त आहे. स्थिती अत्यंत तीव्रतेपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागतो आणि काहीवेळा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. नवीन विषाणू COVID-Omicron XBB ची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत: 1. खोकला नाही. 2. ताप नाही.”

मूळ पोस्ट - फेसबुक

तथ्य पडताळणी

या मेसेजविषयी माहिती घेतली असता कळाले की, यातील माहितीला कोणताही पुरावा नाही. सिंगापुरमध्ये सर्वाधिक कोविड रुग्ण XBB सबव्हेरिएंटमुळे संसर्गित झालेले आहेत.

तेथेदेखली वरीलप्रमाणेच मेसेज व्हायरल झाला होता. तेव्हा सिंगापूर सरकारने स्वतःहून समोर येत तो खोटा असल्याचे सांगितले होते. सिंगापुरच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरील खुलाशानुसार, XBB सबव्हेरिएंटमुळे लोक मोठ्या प्रमाणात आजारी आणि मृत्युमुखी पडत आहे हा दावा तथ्यहीन आहे.

मूळ वेबसाईट – सिंगापूर आरोग्य मंत्रालय

वॉशिंग्टनच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॉल्युशनने (IHME) प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, XBB सबव्हेरिएंट ओमिक्रॉनच्या इतर सबव्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असला तरी त्यापासून होणारा आजार कमी गंभीरस्वरुपाचा असतो. या सेबव्हेरिएंटची तीव्रता मागे आलेल्या लाटेच्या दहापट कमी आहे.

भारतीय आरोग्य मंत्रालयानेसुद्धा या मेसेजविषयी खुलासा करत फेक असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1605823804948631552

XBB सबव्हेरिएंट ओमिक्रॉनच्या BA.2 प्रकाराचे एक रुप आहे. XBB सबव्हेरिएंट आतापर्यंत 35 देशांमध्ये आढळला आहे. एकट्या महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात या व्हेरिएंटचे 18 रुग्ण आढळले होते. याची लक्षणे इतर व्हेरिएंटप्रमाणेच आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज फेक आहे. भारत सरकार आणि सिंगापूर सरकारने हा मेसेज बनावट आणि भ्रामक असल्याचे स्पष्ट केले आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:COVID-19: कोविडचा XBB सबव्हेरिएंट पाचपट जास्त घातक आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False