वाफेच्या इंजिनप्रमाणे हवेत पराग कण उडवणारे फुल खरे आहे की VFX व्हिडिओ? वाचा सत्य

False सामाजिक

सोशल मीडियावर एका जादुई फुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहेत की, तमिळनाडुच्या जंगलामध्ये उगवणारे ऊदई पवई नावाचे हे फुल वाफेच्या इंजनप्रमाणे हवेत पराग कण सोडते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हे काही खरे फुल नसून, व्हीएफएक्स व्हिडिओ आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या फुलातून वाफ बाहेर पडते तसे पराग कण पडताना दिसतात. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हे तामिळनाडू मधील ऊदई पवइ नावाचे फुलं आहे हे वाफेच्या इंजन प्रमाणे हवेत पराग कण सोडते निसर्गातील चमत्कार.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडिओचे निरीक्षण केल्यावर खालच्या बाजूला LUKE PENRY EXR असा वॉटरमार्क दिसतो. हा धागा पकडून सर्च केल्यावर ल्यूक पेन्री नामक एका कॉम्प्युटर अॅनिमेशन कलाकार आहे. 

त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर 16 सप्टेंबर 2021 रोजी मूळ व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम

“जंगल पाईप” असे या व्हिडिओचे नाव आहे. कॅप्शनमधील हॅशटॅगमध्ये व्हीएफएक्स, मोशन ग्राफिक्स, 3-डी आर्ट, डिजीटल आर्ट म्हटलेले आहे. 

ल्यूक पेन्री यांनी हाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून एनएफटी आर्ट म्हणून तो विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली होती. 

फाउंडेशन नामक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ विक्रीसाठी उपलब्ध होता. त्या वेबसाईटवर या व्हिडिओविषयक माहितीमध्ये म्हटले आहे की, भारतात हा व्हिडिओ एका दुर्मिळ औषधी फुलाचा म्हणून बराच गाजला. विशिष्ट आवाजासह हे औषधी फुल वाफेप्रमाणे पराग कण बाहेर सोडते असा दावाही करण्यात आला. अनेकांना हे खरे वाटले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार करण्यात आलेला एक डिजीटल आर्टचा व्हिडिओ दुर्मिळ फुलाचा म्हणून शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ वाफेच्या इंजिनप्रमाणे परागकण बाहेर टाकणाऱ्या फुलाचा नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:वाफेच्या इंजिनप्रमाणे हवेत पराग कण उडवणारे फुल खरे आहे की VFX व्हिडिओ? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply