रेल्वे खासगीकरणाविरोधात गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ आताचा म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात गेल्या सात दिवसांपासून देशभरात आंदोलने सुरू आहेत; परंतु, न्यूज चॅनेल्स त्याची बातमी दाखवत नसल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका मोर्चाचा व्हिडिओ शेयर केला जात आहे. रेल्वे खासगीकरणाविरोधात पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनाचा तो व्हिडिओ आहे, असा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता, हा व्हिडिओ गेल्या वर्षी करण्यात आलेल्या आंदोलनाचा असल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांकावर (9049053770) वाचकांनी पाठविलेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा एक मोर्चा दिसतो. हातात फलक आणि काळे झेंडे घेऊन आंदोलक घोषणा देताना दिसतात. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “अगदी काहीच दिवसांपूर्वी रेल्वेच्या होणाऱ्या खाजगीकरना विरोधात पंजाबमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले होते. ज्याची दखल राष्ट्रीय माध्यमांनी अजिबात घेतली नाही.

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम की-वर्ड्सच्या माध्यामाने सर्च केल्यावर ‘द ट्रीब्युन’ या वृत्तस्थळाने जुलै 2019 मध्ये अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकच असल्याचे स्पष्ट दिसते. 

सोबत दिलेल्या बातमीनुसार, हा व्हिडिओ पंजाबमधील कपूरतळा येथील आहे. तेथे गेल्या वर्षी जुलै महिन्यात रेल्वे कोच फॅक्टरी (RCF) संघर्ष समितीतर्फे  रेल्वे डब्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे खासगीकरण करण्याविरोधात आंदोलन केले होते. गेल्यावर्षी भाजप सरकारची दुसरी टर्म सुरू झाल्यावर रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये खासगीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, कपूरतळा कोच फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला होता. गरज पडल्यास रेल्वे बंद पाडू पण खासगीकरण होऊ देणार नाही, असा पवित्रा आरसीएफ बचाओ संघर्ष समितीने घेतला होता. त्यानुसार अनेक दिवस आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. याची दखल राष्ट्रीय स्तरावरील मीडियाने घेतली होती.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

देशात अलिकडे काही आंदोलने झालीत का?

जुलै महिन्यात ‘सीटू’तर्फे रेल्वे खासगीकरणाविरोधात दोन दिवस आंदोलने केली होती. परंतु, रेल्वे युनियननेसुद्धा जुलै महिन्यात आंदोलन केले होते. परंतु, अलिकडे लाखोच्या संख्येने आंदोलने झालेली नाहीत.

निष्कर्ष

पंजाबमध्ये नुकतेच झालेल्या आंदोलनाचा म्हणून पसरविला जाणार व्हिडिओ मूळात गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या मोर्चाचा आहे. तेथे कपूरतळा येथे रेल्वे डबानिर्मिती कारखान्यांचे खासगीकरण करू नये, या मागणीकरीता जुलै 2019 मध्ये आंदोलन करण्यात आले होते.

(आपल्याकडील संशयास्पद मेसेजची सत्यता जाणून घ्यायची आहे? तर मग तो पाठवा फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांकावर 9049053770)

Avatar

Title:रेल्वे खासगीकरणाविरोधात गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ आताचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False