अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फुकटे’ म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल 

Altered राजकीय

जुनी पेन्शन योजना परत लागू करावी यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय अधिकारी व कर्मचारी 14 मार्च रोजी बेमुदत संपावर गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “संपावर जातात आणि कर्मचाऱ्यांना काम न करता फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.”

दावा केला जात आहे की, अजित पवार जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. अजित पवार सध्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलत नव्हते.

काय आहे दावा ?

या 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणतात की, “काही बोलले तर हे आंदोलन करतात आणि या कर्मचाऱ्यांना महिना फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.”

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “अजितदादा पवार आंदोलनकर्त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर विधीमंडळात बरसले.”

फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडियो 14 मार्च रोजी अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा आहे. यामध्ये ते महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघातील (महानंद) कर्मचारी कपातीबद्दल बोलत होते.

विधानसभेतील लाईव्ह प्रक्षेपणामध्ये अजित पवार म्हणतात की, “महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची (महानंद) आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे महानंदचा कारभार राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) सोपवण्याचा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय योग्य आहे. सध्या महानंदामध्ये 950 कर्मचारी कार्यरत असून आपण एनडीडीबीच्या जागी एका खाजगी कंत्राटदाराला जरी टेंडर दिले तरी 450 पर्यंत कर्मचाऱ्यांत कंपनी चालू शकते, असे आम्ही म्हणालो तर ते आंदोलनाला बसतील, कारण त्यांना काम न करता महिन्याला फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.”

खालील व्हिडिओमध्ये 4 तास 26 मिनिट 46 सेकंदावर सदरील वक्तव्य पाहू शकतात. 

महानंदचे प्रकरण

लोकसत्ताच्या बातमीनुसार, ‘महानंद’चा ढासळता आर्थिक डोलारा सांभाळणे आता राज्य सरकारच्याही आवाक्याबाहेर गेल्यामुळे महानंद आता राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (एनडीडीबी) चालविण्यास देण्याचा विचार सुरू आहे.

मर्यादित दूध संकलन, बंद पडलेले प्रकल्प आणि वाढीव उत्पादन खर्च अशा विविध कारणांमुळे ‘महानंद’ अडचणीत आली आहे. याविषयी सविस्तर माहिती येथे वाचा. 

जुनी पेन्शन योजना संप

हिमाचल प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातदेखील जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी सुमारे 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी 14 मार्चपासून संपावर गेले आहेत. शासकीय कर्माचाऱ्यांच्या संपामुळे जवळपास सर्वच कामे ठप्प पडली असून, सोशल मीडियावर जुन्या पेन्शनच्या मागणीविषयी जनमत विभागले गेले आहे. याविषयी सविस्तर माहिती येथे वाचा.

संपाविषयी अजित पवारांचे मत

विधानसभे बाहेर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारला असून याचा परिणाम राज्यातील अत्यावश्यक सेवेवर झाला आहे. सरकारने संघटनेसोबत चर्चा केली पण काही तोडगा निघाला नाही. सरकारने कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढायचा प्रयत्न केले पाहिजे. देशातील काही राज्यांनी ही पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, अजित पवार यांचा अर्धवट व्हिडिओ शेअर करून दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. अजित पवारांनी जुन्या पेन्शनसाठी संपावर गेलेल्या शासकीय कर्माचाऱ्यांना फुकटचा पगार घेण्याची सवय असल्याचे विधान केले नव्हते. ते ‘महानंद’मधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांबद्दल बोलत होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फुकटे’ म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल 

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered


Leave a Reply