
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेतील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पकडल्याचे दिसते.
सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये मुंडे यांचा फोटो घेऊन चालले. या फोटोवरून राहुल गांधी यांनी विरोधकांचा सन्मान केला म्हणून त्यांचे कौतुकदेखील केले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. राहुल गांधी यांच्या हातात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये राहुल गांधी यांच्या हातात गोपीनाथ मुंडे फोटो दिसतो. सोबत म्हटले आहे की, “राजकारण विरहित यात्रा काढून मन जिंकून घेतली राहुलजी तुम्ही.”

मूळ पोस्ट – फेसबुक । इन्स्टाग्राम
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की तो एडिट केलेला आहे.
काँग्रेसचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेतील काही फोटो शेअर केल्याचे आढळले.
यामध्ये एक फोटो व्हायरल होत असलेल्या फोटोशी साधर्म्य असणारा आहे.
मूळ फोटोमध्ये राहुल गांधी यांच्या हातात गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसून, त्यांच्या हातात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो आहे.
दोन्ही फोटोंची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो. कोणीतरी खोडसाळपणे अहिल्याबाई होळकर यांच्या जागी गोपीनाथ मुंडे यांचा फोटो एडिट करून लावल्याचे स्पष्ट होते.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पकडला नव्हता. व्हायरल फोटो बनावट असून, मूळ फोटोत राहुल गांधी यांच्या हातात अहिल्याबाई होळकर यांचा फोटो आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Altered
