नरेंद्र मोदी हे जागतिक आरोग्य संघटनेचे नवे अध्यक्ष नाहीत; वाचा सत्य

Coronavirus False राजकीय सामाजिक

जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षस्थानी पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान आरुढ झाले असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद खरोखरच भारतीय पंतप्रधानांना मिळाले आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

WHO MODI BHAKT.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे का? हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन समित्या असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य सभा आणि कार्यकारी संचालक समिती अशा या दोन समित्या आहेत. जागतिक आरोग्य सभा ही निर्णयप्रकियेत अतिशय महत्वपुर्ण असल्याचे दिसून येते. विविध देशांतील सदस्यांच्या मार्फत या सभेचे कामकाज चालते. कार्यकारी समितीने तयार केलेल्या आरोग्य धोरणांवर सभा निर्णय घेते. प्राधान्याचा मुद्दा मात्र सभा ठरवत असल्याचे दिसून येते. कार्यकारी समितीतील 34 तांत्रिक अर्हताप्राप्त सदस्य तीन वर्षासाठी असतात. आरोग्य सभेमार्फत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची आणि धोरणांची अंमलबजावणी करणे, हे कार्यकारी समितीचे कार्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या 147 व्या अधिवेशनातील बैठकीत भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे दिसून येते. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी त्यांचे केलेले अभिनंदन आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस हे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक असून जागतिक आरोग्य संघटनेचे ते सर्वोच्च पद असल्याचे संघटनेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीतून दिसून आले. संयुक्त राष्ट्रसंघाने डॉ. हर्षवर्धन यांचे केलेले अभिनंदन आणि डॉ. हर्षवर्धन यांनी पदभार स्वीकारल्यावर मानलेले आभारही आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

यातून हे स्पष्ट होते की, डॉ. हर्षवर्धन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष (संग्रहित) आहेत. 

निष्कर्ष

जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदी भारताच्या पंतप्रधानांची निवड करण्यात आली ही बाब असत्य आहे. भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Avatar

Title:नरेंद्र मोदी हे जागतिक आरोग्य संघटनेचे नवे अध्यक्ष नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False