मुंबईत तुंबलेले पाणी आणि उसळणाऱ्या लाटांचे जुने व्हिडिओ यंदाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False नैसर्गिक आपत्ती

मुंबई शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा गुरुवारी (7 जुलै) सकाळी जोर वाढला. याचा परिणाम म्हणून लोकल सेवा विलंबाने धावत असल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर मुंबईच्या रस्त्यावर साचलेले पाणी, पाण्यातून धावणारी लोकल रेल्वे, आणि गेटवे ऑफ इंडियावरील लाटांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे तीन्ही व्हिडिओ सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या स्थितीचे असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ यंदाचा नसून, दोन वर्षांपूर्वीचा आहे. 

काय आहे दावा?

पहिल्या व्हायरल व्हिडिओत दिसते की, रस्त्यावर कंबरेइतके पाणी साचलेले आहे. या पाण्यात वाहने तरंगत असल्याचेही दिसते. इतकी भयावह परिस्थिती सध्या मुंबईत असल्याचे व्हिडिओसोबत म्हटले आहे.

मूल पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पाहू की, व्हिडिओ नेमका कधीचा आहे. व्हिडिओतील कीफ्रेमला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ 2020 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

23 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रांट रोड भागात साचलेले पाणी म्हणून व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. तो तुम्ही येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

म्हणजेच हा व्हिडिओ या वर्षीचा नाही.

मग हा नेमका कुठला?

गुगल मॅपच्या सहाय्याने ग्रांट रोड भागामध्ये शोध घेतल्यावर कामा बाग भागातील हा व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. 

मुख्यतः पारसी बहुल या भागातील 14 क्रमांकाच्या गल्लीतील खेतवाडी मार्गाचा हा व्हिडिओ आहे. गुगल मॅपवरील उपलब्ध फोटो आणि व्हिडिओत दिसणारे स्थळ यांची तुलना केल्यावर सिद्ध होते की, हा व्हिडिओ कामा बाग भागातील आहे.

23 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईत अनेक भागांमध्ये 300 मि.मी. पेक्षाही जास्त पाऊस पडला होता. 10-12 तासांपेक्षा अधिक काळ पाणी साचलेले होते. नायर रुग्णालयात पाणी भरले होते.

स्त्रोत – गुगल मॅप


ALSO READ: गाड्यांवर स्लॅब कोसळल्याचा ‘तो’ व्हिडिओ मुंबईचा नसून, सौदी अरेबियाचा आहे


जलमय लोकलचा व्हिडिओदेखील जुना

पाण्यातून लोकल रेल्वे धावत असल्याचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओदेखील यंदाचा नाही. हा व्हिडिओ गेल्या वर्षीपासून (2021) इंटरनेटवर उपलब्ध आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे.

रौद्र लाटांचा व्हिडिओसुद्धा जुना

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ उसळणाऱ्या तुफान लाटांचा व्हिडिओ सध्या उफाळलेल्या अरबी समुद्राचा म्हणून शेअर केला जात आहे. परंतु, हा व्हिडिओसुद्धा गेल्या वर्षीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 18 मे 2021 रोजी मुंबईच्या किनारपट्टीवर तौते चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अशा विशाल लाटा पाहायला मिळाल्या होत्या.


ALSO READ: उसळणाऱ्या लाटांचा हा व्हिडिओ स्पेनमधील आहे; कोकणातील नाही


सध्या काय परिस्थिती आहे मुंबईत?

सोमवारपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात मुसळधार पाऊस झाला. अंधरी सबवे, मालाड सबवेसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे. 

येत्या काळात मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता विभागीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, जुने व्हिडिओ सध्याच्या सुरू असलेल्या मुंबईतील पावसाचे म्हणून व्हायरल होत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या संकटीसमयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट नागरिकांमध्ये भीती निर्माण करू शकतात. जबाबदार नागरिक म्हणून आपण सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट करण्यापूर्वी सत्यतेबद्दल खात्री करून घ्यावी.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुंबईत तुंबलेले पाणी आणि उसळणाऱ्या लाटांचे जुने व्हिडिओ यंदाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False