राज्यपाल कोश्यारी यांनी लॉकडाऊन दरम्यान मॉडेलला मदत केल्याची बातमी फेक. वाचा सत्य

Coronavirus False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करीत एका मॉडेलला लष्कराच्या हेलीकॉप्टर आणि वाहनातून डेहराडूनला पोहचविल्याची बातमी मध्यंतरी पसरली होती. काही मीडिया वेबसाईट्सने ही बातमी चालवली होती. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. 

काय आहे पोस्टमध्ये?

न्यूज उत्तराखंड या वेबसाईटवरील एका बातमीचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये शेयर करण्यात आला आहे. कोश्यारी यांनी लॉकडाऊनमध्ये एका मॉडेलला सैन्य हेलिकॉप्टर आणि वाहनातून डेहराडून येथे पोहचविले असे याचे शीर्षक आहे. 

Koshyari.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

यासंबंधी पडताळणी सुरू केली असता न्यूज उत्तराखंड (अर्काइव्ह) आणि पर्वतजन (अर्काइव्ह) या संकेतस्थळांवरील बातम्या आढळल्या. त्यानुसार, या मॉडेलचे नाव जैनी उर्फ जयंती असे आहे. तिने पर्वतजन वेबसाईटशी बोलताना आधी सांगितले होते की, ती महाराष्ट्रातून राजभवनाच्या पासवर डेहराडूनला आली होती. परंतु, तिने हे विधान मागे घेतले. तिने नंतर खुलासा केला की, आधी सांगताना तिच्याकडून चूक झाली. ती दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे लॉकडाऊन सुरू होण्याआधीच महाराष्ट्रातून परतली होती. 

मग राजभवनाचा काय संबंध?

जयंती यांनी मीडियाला सांगितले की, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हिमाचल प्रदेशच्या राजभवनाने दिलेल्या पासच्या मदतीने ती उत्तराखंडला पोहचली. तिने हिमाचल राजभवनच्या 25 एप्रिल रोजीच्या परवानगी पत्राची प्रतदेखील शेयर केली. ती तुम्ही खाली पाहू शकता. यातून हे स्पष्ट होते की, या तिला हिमाचल प्रदेशच्या राजभवनातून देण्यात आले होते; महाराष्ट्राच्या नाही.

letter.png

महाराष्ट्र राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, राज्यपाल कोश्यारी यांच्याविषयी समाजमाध्यमांत खोटी माहिती पसरत असून, त्यात काहीही तथ्य नाही. याबाबत सायबर विभागाकडे रीतसर तक्रार देण्यात आली आहे.

राजभवनाच्या ट्विटवरूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. त्यात म्हटले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटे व बदनामीकारक वृत्त वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी राज्यपालांतर्फे मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्षाकडे तक्रार नोंदविण्यात आली. एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून येथे प्रवास करण्यास मदत केल्याचे असत्य व बदनामीकारक वृत्त सदर वेबपोर्टलने प्रसिद्ध केले होते, या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली.

Archive

सायबर पोलिसांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, 24-25 एप्रिल रोजी सदरील मॉडेल महिलेला महाराष्ट्र राजभवनातून कोणतेही पत्र देण्यात आले नव्हते. राज्यपालांची बदनामी केल्यावरून आयपीसीचे कलम 500 आणि 501 नुसार पोर्टलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोर्टाच्या परवानगीनुसार या प्रकरणी पुढील तपास करण्यात येईल.

निष्कर्ष

राज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेल अभिनेत्रीसाठी पत्र जारी करून तिला सैन्य वाहनातून डेहराडूनला पोहचविल्याचे वृत्त खोटे आहे. सदरील मॉडेल अभिनेत्रीला हिमाचल प्रदेशच्या राजभवानातून पत्र देण्यात आले होते. खोट्या बातमीप्रकरणी महाराष्ट्र राजभवनातर्फे सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:राज्यपाल कोश्यारी यांनी लॉकडाऊन दरम्यान मॉडेलला मदत केल्याची बातमी फेक. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •