Fact Check : गुजरातमधील दुकानात 2016 मध्ये सापडलेली हत्यारे मशिदीत सापडली म्हणून व्हायरल

False सामाजिक

गुजरातमधील राजकोटमध्ये एका मशिदीत हत्यारे सापडल्याची पोस्ट शिवराज्य सेना या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. मशिदीत हत्यारे सापडत असताना पुरस्कार परत करणाऱ्या टोळी मात्र जय श्रीरामच्या घोषणेची भीती वाटतेय. या 49 टोळीचा सगळ्या क्षेत्रामध्ये बहिष्कार केला पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

गुजरातमधील राजकोटमध्ये मशिदीत हत्यारे पकडली आहेत का? असे असल्यास याची माहिती मराठी प्रसारमाध्यमांमध्ये कशी दिसून नाही आली, असा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे आम्ही इंग्रजीत Weapons seized from Gujarat mosque असा शब्दप्रयोग करुन याबाबतच्या वृत्ताचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला.

ARCHIVE

या परिणामात गुजरात टूडे या इंग्रजी वृत्तपत्रात 5 मार्च 2016 रोजी प्रसिध्द झालेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात राजकोटमध्ये एका दुकानात घातक शस्त्रात्रे सापडल्याचे म्हटले आहे.   

GUJARAT HEADLINE | ARCHIVE

द टाईम्स ऑफ इंडियानेही 6 मार्च 2016 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्ताच्या शीर्षकात स्पष्टपणे बेकायदा शस्त्रास्त्र विक्री केल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे. राजकोट-अहमदाबाद महामार्गावर एका हॉटेलमधील दुकानातून ही शस्त्रास्त्र विक्री होत होती, असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. 

TIMES OF INDIA | ARCHIVE

दैनिक भास्करच्या संकेतस्थळावरही 5 मार्च 2016 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय महामार्गालगत इंडिया पॅलेस हॉटेलच्या नॉवेल्टी स्टोअरमध्ये खुलेआम विक्री करण्यात येत असलेली तलवार, चाकू आणि गुप्ती ही 257 हत्यारे पोलिसांनी जप्त केल्याचे म्हटले आहे. पोलिसांना गस्त घालत असताना याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारत 5 जणांना अटक केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

DAINIK BHASKAR | ARCHIVE

निष्कर्ष

राजकोट-अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलमधील एका दुकानात मार्च 2016 मध्ये खुलेआम तलवार, चाकू आणि गुप्तीची बेकायदेशीरपणे विक्री सुरु होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून ही शस्त्रे जप्त केली. सध्या या पकडलेल्या शस्त्रास्त्रांची छायाचित्रे सोशल मीडियावर गुजरातमधील मशिदीत हत्यारे सापडली म्हणून पसरविण्यात येत आहेत. गुजरातमधील मशिदीत हत्यारे सापडल्याची बाब फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:Fact Check : गुजरातमधील दुकानात 2016 मध्ये सापडलेली हत्यारे मशिदीत सापडली म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False