अलास्काच्या खाडीमध्ये खरंच दोन महासागरांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग आपल्याला चकित करण्यात कधी चुकत नाही. निसर्गाच्या कुशीत कित्येक गोष्टी आहेत ज्या पाहून आचंबित होण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो. निसर्गाची अशीच एक किमया सोशल मीडियावर लोकांना भुरळ पाडत आहे. दावा केला जात आहे की, प्रशांत आणि हिंदी या दोन महासागरांचा अलास्काच्या खाडीमध्ये संगम होतो. या ठिकाणी दोन्ही महासागरांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमध्ये इन मराठी वेबसाईटवरील एका लेखाची लिंक शेयर करण्यात आली आहे. या लेखात हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या कथित संगमाचे फोटो देऊन दावा करण्यात आला की, अलास्काच्या खाडीत हे दोन महासागर एकत्र येऊनही त्यांचे पाणी वेगळेच राहते. त्यांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही. दोघांच्या रंगातसुद्धा फरक लगेच दिसून येतो. पाणी एकमेकांत न मिसळण्याचे मुख्य कारण म्हणजे या दोघांमध्ये असलेले क्षारांचे प्रमाण. या दोन्ही पाण्यातील क्षार, घनता व तापमान वेगवेगळे असते.

मूळ लेख येथे वाचा – इन मराठीअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम प्रशांत महासागर (Pacific Ocean), हिंदी महासागर (Indian Ocean) आणि अलास्काची खाडी (Gulf of Alaska) यांचे भौगोलिक स्थान कुठे आहे ते पाहू. खाली दिलेल्या नकाशामध्ये स्पष्ट दिसते की, अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर अलास्काची खाडी आहे. उत्तर प्रशांत महासागराचा तो एक भाग आहे. हिंदी महासागर आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांच्यामध्ये आहे. त्यामुळे हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराचा अलास्काच्या खाडीत संगम होण्याचा काही प्रश्नच येत नाही.

मग अलास्काच्या खाडीत दोन वेगवेगळ्या रंगाच्या पाण्याचे रहस्य काय?

अमेरिकेच्या अलास्का राज्याला लागून असलेल्या उत्तर प्रशांत महासागराचा भाग म्हणजे अलास्काची खाडी. लेखात दिलेला वेगवेगळ्या रंगाच्या पाण्याचा फोटो केंट स्मिथ नावाच्या एका छायाचित्रकाराने जुलै 2010 साली काढला होता. त्याने फोटो शेयरिंग वेबसाईट फ्लिकरवर हे छायाचित्र अपलोड केले होते. तेव्हापासून या फोटोचा वापर करून ना ना प्रकारचे दावे करण्यात येत आहेत.

जिओलॉजी पेज नावाच्या वेबसाईटनुसार, अलास्काच्या खाडीमध्ये दोन महासागर एकत्र येत नाहीत. अलास्काच्या खाडीमध्ये ग्लेशियरचे पाणी (हिमनदी) प्रशांत महासागरात जाऊन मिसळते. पाण्याच्या रंगामध्ये फरक दिसण्याचे कारण म्हणजे दोघांची घनता, तापमान आणि क्षारांचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे हे पाणी एकमेकांत मिसळत नसल्याचे वाटते.

मूळ लेख येथे वाचा – जिओलॉजी पेजअर्काइव्ह

कॅलिफोर्निया-सँटा क्रुज विद्यापीठातील महासागरीय विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. केन ब्रुलँड यांनी अँकरेज डेली न्यूजला माहिती दिली होती की, अलास्कामधील ग्लेशियरचा बर्फ वितळून हिमनदीवाटे पाणी प्रशांत महासागराला येऊन मिळते. दरम्यान, या पाण्यासोबत मोठ्याप्रमाणात गाळसुद्धा येतो. महासागराचा प्रवाह या गाळाला किनाऱ्यापासून दूर घेऊन जातो. 

“पाण्याच रंग जरी वेगवेगळा दिसत असला तरी, ते एकत्र मिसळत नाही असे म्हणने चुकीचे आहे,” असे डॉ ब्रुलँड म्हणाले. “ग्लेशियरचे पाणी पर्यायाने महासागरात मिसळतेच. परंतु, काही विशिष्ट क्षणी गाळयुक्त पाण्यामुळे न मिसळ्याचा भास होतो. काळानुरूप दोन्ही पाणी पूर्णतः एकमेकांत मिसळून जाते.”

मूळ लेख येते वाचा – अँकरेज डेली न्यूजअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीदेखील हिंदी व प्रशांत महासागराचे पाणी एकत्र न येण्याचा फोटो असत्य असल्याचे सिद्ध केले आहे. अमेरिकेतील मिसिसिपी नदी जेथे मेक्सिकोच्या खाडीला जाऊन मिळते तेथे डेड झोनमुळे पाण्याचा रंग भिन्न दिसतो. तेथील फोटो हिंदी व प्रशांत महासागराच्या मिलनाचा म्हणून पसरविण्यात येतो.

मूळ फॅक्ट चेक येथे वाचा – फॅक्ट क्रेसेंडो

निष्कर्ष

अलास्काच्या खाडीत हिंदी व प्रशांत महासागराचा संगम होत नाही. ग्लेशियरच्या पाण्यातील गाळ, क्षार, तापमान आणि घनता यामुळे तेथील पाण्याचा रंग काही काळासाठी वेगळा दिसतो. ते पाणी काळानुरूप प्रशांत महासागराच्या पाण्यात मिसळून जाते. त्यामुळे इन मराठी वेबसाईटवरील लेखात दिलेली माहिती असत्य ठरते.

Avatar

Title:अलास्काच्या खाडीमध्ये खरंच दोन महासागरांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False