कर्नाटकात भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावला का? वाचा सत्य

False राष्ट्रीय सामाजिक

एका बुरखाधारी व्यक्तीचा व्हिडिओ पसरवून कर्नाटकात सिद्धू परागोंडा नावाच्या भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकवला. त्याला स्थानिकांनी रंगेहात पकडल्याचा दावा समाजमाध्यमात करण्यात येत आहे. कर्नाटकात भाजप कार्यकर्त्यास पाकिस्तानचा झेंडा फडकवत असताना खरोखरच स्थानिकांनी पकडले का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

कर्नाटकात अशी काही घटना घडली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी द हिंदू ( संग्रहित वृत्त ) या इंग्रजी दैनिकाने 16 जून 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार सिंद्गी या ठिकाणी 11 जून 2020 रोजी एक घटना घडली होती. एका बँकेबाहेर काही महिला रांगेत उभ्या होत्या. त्यावेळी एक बुरखाधारी व्यक्ती संशयास्पद वर्तन करताना दिसून आली. ही व्यक्ती महिलांच्या अतिशय जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे महिलांना त्याच्याविषयी संशय आला. काही जणांनी त्या व्यक्तीस बँकेच्या बाहेर आणले. ती व्यक्ती महिला नसून पुरूष असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी या व्यक्तीला मारहाण करत पोलिसांच्या हवाली केले. या वृत्तात कुठेही ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचे अथवा तिने पाकिस्तानचा झेंडा फडकविल्याचे म्हटलेले नाही. 

The Hindu.png

द हिंदू / संग्रहित 

त्यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने विजयपुराचे पोलीस अधिक्षक अनुपम अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, या घटनेबाबत ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आणि तिने पाकिस्तानी ध्वज फडकविल्याचा दावा असत्य आहे. या व्यक्तीला बुरखा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या व्यक्तीची जामिनावर सुटका झाली असली तरी या घटनेचा तपास सुरू आहे. 

निष्कर्ष

कर्नाटकात भाजप कार्यकर्त्याने बुरखा घालून पाकिस्तानचा ध्वज फडकविल्याचा दावा असत्य आहे. ही व्यक्ती बुरखा घालून महिलांची छेड काढत असल्याने या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

Avatar

Title:कर्नाटकात भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावला का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False