सायकल गर्ल ज्योती पासवान हिची हत्या, बलात्काराची माहिती खोटी; वाचा सत्य

False सामाजिक

वडिलांना सायकलवरुन 1700 किलोमीटर अंतर पार करुन बिहारला घेऊन गेलेल्या ज्योती पासवान या मुलीवर बलात्कार करुन तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची माहिती काही छायाचित्रांसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. ज्योती पासवानसोबत खरंच अशी काही घटना घडली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.07-17_21_27.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

ज्योती पासवानसोबत अशी काही घटना घडली आहे का, हे जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने तिचे वडील मोहन पासवान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, समाजमाध्यमात पसरत असलेली माहिती चुकीची आहे. ज्योती पासवान जीवंत असून व्यवस्थित आहे. समाजमाध्यमात मृतावस्थेत छायाचित्रे असलेली मुलगी ही सायकल गर्ल म्हणून ओळखली जाणारी ज्योती पासवान नाही. ज्योती ही सध्या सायकलचा सराव करत आहे. समाजमाध्यमात आम्ही सुध्दा ही माहिती पाहिली आहे. ही माहिती पाहिल्यावर अनेक नातलगांनीही आम्हाला दुरध्वनीवर संपर्क साधला. या असत्य माहितीविरोधात कमतौल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समाजमाध्यमाचा वापर करणाऱ्यांना ही असत्य माहिती पसरवू नये, असे आवाहन आम्ही करत आहोत.

त्यानंतर कमतौल पोलीस ठाण्याचे एसएचओ सवार आलम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ज्योती पासवानच्या नावाने समाजमाध्यमात खोटी माहिती पसरत आहे. समाजमाध्यमात पसरत असलेली ती छायाचित्रे ज्योती पासवानची नाहीत. ज्योती पासवानशी ज्या घटनेचा संबंध जोडण्यात येत आहे ती एक वेगळी घटना आहे. ज्योती पासवान सुरक्षित आहे. तिच्या वडीलांनी या असत्य माहितीबाबत फिर्याद दिली आहे. या संबधात शाहीन सेगल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमके सत्य काय?

याबाबत आणखी शोध घेतल्यावर लाईव्ह हिंदुस्थान या संकेतस्थळाने 1 जुलै 2020 रोजी प्रकाशित केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार 13 वर्षाच्या ज्योतीकुमारी हिचा मृतदेह आढळून आला होता. या मुलीवर अत्याचार झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. वीजेचा धक्का बसल्याने गुदमरून या मुलीचा मृत्यू झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पतौर दुरक्षेत्राचे एसएचओ बरून कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानुसार ज्योतीकुमारीचा मृत्यू हा वीजेच्या धक्क्याने झाला आहे. या अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याचा कोणताही उल्लेख नाही. याबाबत अजुन तपास करण्यात येत आहे परंतू एवढे निश्चितपणे सांगता येईल की, तिच्यावर अत्याचार झालेला नाही. तिचा मृत्यू वीजेच्या धक्क्याने झाला असून तिच्या गळ्याजवळ तशा खूणा आढळल्या आहेत. ही ज्योतीकुमारी म्हणजे सायकल गर्ल ज्योती पासवान नाही. दोघींचे नाव एकसारखे असल्याने हा गैरसमज झाला असावा. 

द टाईम्स ऑफ इंडियाने 2 जुलै 2020 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतीकुमारीच्या वडिलांनी अर्जुन मिश्रा नावाच्या व्यक्तीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. मिश्रा याने त्याच्या बागेतील ज्योतीकुमारीने आंबे चोरल्याने हे कृत्य केल्याचे ज्योतीकुमारीच्या वडिलांनी म्हटले आहे. याप्रकरणी ज्योतीकुमारीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

दरभंगाचे एसएसपी राम बाबू याबाबत म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात ज्योतीकुमारीवर अत्याचार झाल्याचा कोणताही उल्लेख नाही. मृत्यूचे कारण हे वीजेचा धक्का आणि गुदमरणे हे आहे. ज्योतीकुमारीच्या वडिलांनी केलेल्या आरोपांबाबतही तपास करण्यात येत आहे. ज्योतीकुमारी आणि सायकल गर्ल ज्योती पासवान या दोन वेगळ्या मुली आहेत. या दोन्ही दरभंगाच्या आहेत. ज्योती पासवान जीवंत आणि व्यवस्थित आहे. 

संग्रहित

निष्कर्ष 

सायकल गर्ल ज्योती पासवान हिची हत्या आणि बलात्काराची समाजमाध्यमातील माहिती असत्य आहे. ती जीवंत असून व्यवस्थित आहे.

Avatar

Title:सायकल गर्ल ज्योती पासवान हिची हत्या, बलात्काराची माहिती खोटी; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False