उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

False Social

उत्तर प्रदेशमधील मदरशांचे शैक्षणिक दिनदर्शिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उतर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे. 

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. मदरशांमध्ये रविवारी सुट्टी जाहीर करण्याचा केवळ प्रस्ताव होता, तो मंजूर झालेला नाही. 

काय आहे दावा ?

उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीनंतर वृत्तवाहिन्यांनी बातमी प्रसारित केली की, “यूपीच्या मदरशांच्या साप्ताहिक सुट्टीत बदल केला आहे, आता शुक्रवारच्या जागी रविवारी होणार सुट्टी.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्ट संबंधित कीव्हडर्स सर्च केले असता कळाले की, मदरशांमधील साप्ताहिक सुट्टीमध्ये बदल करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

लोकमत टाईम्सनुसार उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण मंडऴाच्या बोर्डाचे अध्यक्ष इफ्तिकार अहमद जावेद यांनी साप्ताहीक सुट्टीचा हा प्रस्ताव मांडला होता. मंडळाची पुढची बैठक जानेवारी महिन्यात होणार असून तेव्हाच यावर निर्णय घेतला जाणार आहे.

जेएस न्युज टाईम्स अनुसार 20 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश मदरसा शिक्षक परिषदेने अधिकृत अरबी-फारसी मदरसा मान्यता प्रशासन आणि सेवा नियम, 2016 मध्ये सुधारणा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. 

ही बैठक मदरसा बोर्डाचे अध्यक्ष इफ्तिकार अहमद जावेद यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. परंतु ही बैठक मदरसा बोर्डाची नव्हती. या बैठकीत मदरशाच्या प्राचार्यांनी शुक्रवारच्या जागी रविवारी साप्ताहिक सुट्टी असावी असे सुचवले.

डॉ. अहमद जावेद यांनी स्पष्ट केले की, ही बैठक मदरसा बोर्डाची नसून मदरशांशी संबंधितांची बैठक असून त्यात सुट्टी संबंधित केवळ सूचना केल्या होत्या, कोणतेही प्रस्ताव मांडले नव्हते.

जावेद यांनी मांडलेल्या सूचनेला मदरसा शिक्षक संघटनेने विरोध केला होता. त्याचे म्हणणे होते की, शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असा बदल केल्यावर चुकीचा संदेश जाईल.

मदारिस अरबिया शिक्षक संघटनेचे उत्तर प्रदेश सरचिटणीस दिवाण जमान यांनी सांगितले की, शुक्रवारच्या नमाजासाठी विशेष व्यवस्था केली जाते आणि त्यामुळेच शुक्रवारी मदरशांना सुट्टी असते. देशभरातील मदरसे शुक्रवारी बंद असतात. इस्लाममध्ये शुक्रवारच्या नमाजला विशेष महत्त्व आहे आणि ‘जुम्मा’ची तयारी पाहता या दिवशी मदरसे बंद असतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, उत्तर प्रदेशातील मदरशांच्या साप्ताहिक सुट्टीत बदल करण्यात आलेला नाही. शुक्रवारच्या जागी रविवारी सुट्टी करण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False