‘मोदींनी भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवले’ असे सुंदर पिचाई म्हणाले का? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

भारत पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू खरेदी करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नुकतीच केली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नरेंद्र मोदींवर “भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवल्याची” टीका केली आहे.

एबीपी माझाचा लोगो आणि सुंदर पिचाई यांचा फोटो वापरून तयार करण्यात आलेल्या व्हायरल ग्राफिकमध्ये असेही म्हटले आहे की, अमेरिकेकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे “भारतासाठी लाजिरवाणे” आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बानावट असून सुंदर पिचाई यांनी असे वक्तव्य केलेले नाही.

काय आहे दावा ? 

व्हायरल ग्राफिकमधील मजकूर:

“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश ट्रम्प यांच्या हस्ते अमेरिकेला ओलीस ठेवला आहे. अमेरिकेच्या दृष्टीने भारत हा त्यांचा गुलाम देश आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनी त्याची झलक दाखवत दिल्ली भेटीदरम्यान भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सचा माल खरेदी करेल, अशी घोषणा केली. हे भारतासाठी लाजिरवाणे आहे. मोदींनी भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे.
– सुंदर पिचाई, सीईओ, गुगल”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी असे वक्तव्य केले असते, तर ती मोठी आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती. मात्र, कोणत्याही अधिकृत माध्यमात किंवा विश्वासार्ह वृत्तसंस्थेत अशी बातमी आढळली नाही.

याशिवाय, एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील हे ग्राफिक उपलब्ध नाही.

उलट, एबीपी माझाने 27 मे रोजी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करून हे ग्राफिक बनावट असल्याचे स्पष्ट केले. 

पोस्टमध्ये लिहिले की, “एबीपी माझाच्या नावाने व्हायरल होणारी सुंदर पिचाईंची पोस्ट फेक आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक

निष्कर्ष

पडताळणीतून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक बनावट आहे आणि ते एबीपी माझाने जारी केलेले नाही. तसेच सुंदर पिचाई यांनी “मोदींनी भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवले” असे वक्तव्य केलेले नाही. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: ‘मोदींनी भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवले’ असे सुंदर पिचाई म्हणाले का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *