
सोशल मीडियावर हँड ग्रेनेडसारख्या डिझाइनचे काही पेन दाखवणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत हे पेन प्रत्यक्षात ‘पेन बॉम्ब’ असून त्यावरील बटण दाबल्यास स्फोट होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांक (9049053770) वर पाठवून या दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली.
तपासात हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे दावा?
सोशल मीडिया पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, “सावधान! पोलिसांनी मोठा इशारा जारी केला आहे. दिसायला साधा पेन असला तरी तो प्रत्यक्षात बॉम्ब आहे. अशा संशयास्पद पेनपासून दूर राहा.”
झी न्यूज, न्यूजफर्स्ट प्राइम आणि ऑल इंडिया मीडिया असोसिएशन काही माध्यमांनीही अशाच स्वरूपाची माहिती प्रसारित केली.
मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम, जर अशा प्रकारचे स्फोटक पेन प्रत्यक्षात अस्तित्वात असते किंवा त्याबाबत पोलिसांनी इशारा दिला असता, तर ती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरली असती. मात्र, पोलिस किंवा सरकारी यंत्रणांनी असा कोणताही अधिकृत इशारा जारी केल्याचे आढळले नाही.
तसेच रिव्हर्स इमेज सर्चमध्ये हेच पेन Etsy या ई-कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळले.
तेथे या उत्पादनाचे वर्णन सामान्य लिहिण्याच्या पेनप्रमाणे करण्यात आले असून त्याला केवळ लष्करी थीम आणि हँड ग्रेनेडसारखा देखावा देण्यात आल्याचे नमूद आहे.
यापुढे शोध घेतल्यावर हे उत्पादन Grenade Click Pen Kit या नावाने अमेरिकेतील Penn State Industries ही कंपनी तयार करत असल्याचे आढळले.
कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, हे एक सजावटीचे क्लिक पेन आहे. त्यामध्ये सामान्य पार्कर शाईची रिफिल वापरली जाते. पेनसोबत दिलेल्या मार्गदर्शिकेत रिफिल, स्प्रिंग, प्लंजर आणि क्लिक यंत्रणा कशी जोडायची याची माहिती देण्यात आली आहे.
पेनवर दिसणारा लीव्हर आणि स्प्रिंग हे स्फोटासाठी नसून, शाईची रिफिल बाहेर-आत करण्याच्या क्लिक यंत्रणेचा भाग आहेत. तसेच कंपनीच्या कोणत्याही अधिकृत माहितीमध्ये डेटोनेटर, स्फोटक पदार्थ, बॅटरी किंवा इतर कोणत्याही स्फोटक यंत्रणेचा उल्लेख नाही. त्यामुळे हे पेन केवळ लिहिण्यासाठी वापरले जाणारे सामान्य उत्पादन असल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांचे खंडन
काही पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिसांनी या कथित ‘पेन बॉम्ब’बाबत इशारा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, बुलंदशहर पोलिसांनी 15 जून रोजी सोशल मीडियावर याचे अधिकृत खंडन केले. विभागाने स्पष्ट केले की, त्यांनी अशा प्रकारचा कोणताही इशारा जारी केलेला नाही आणि सोशल मीडियावर फिरणारा दावा खोटा आहे.
निष्कर्ष
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे पेन हे स्फोटक नसून हँड ग्रेनेडच्या आकारात तयार केलेले सामान्य क्लिक पेन आहेत. त्यांना ‘पेन बॉम्ब’ असल्याचा दावा कोणत्याही पुराव्याशिवाय सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यामुळे हा दावा खोटा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


