मिशन शक्तीः भारताने खरंच हेरगिरी करणारा सॅटेलाईट उद्ध्वस्त केला? वाचा सत्य

False राजकीय राष्ट्रीय

भारताने बुधवारी (27 मार्च 2019) अँटी-सॅटेलाईट मिसाईलची यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या “मिशन शक्ती”विषयी व्हिडियोद्वारे माहिती दिली. अशी क्षमता बाळगणारा भारत जगातील केवळ चौथा देश असल्याचे ते म्हणाले. यानंतर सोशल मीडियावर मिशन शक्तीबद्दल विविध दावे करणाऱ्या पोस्ट फिरू लागल्या.

त्यापैकीच एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हेरगिरी करणारा एक सॅटेलाईट भारताने उद्ध्वस्त केला. ही पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

पुण्याचा सरपंच नामक फेसबुक पेजवरून 27 मार्च रोजी ही पोस्ट करण्यात आली होती. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 1100 वेळा शेयर आणि तिला 1800 पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. यामध्ये म्हटले की, “भारताने लो ऑरबिट सॅटेलाईट पाडले. मिशन शक्ती सक्सेसफुल. भारतावर हेरगिरी करणारा अंतराळातील सॅटेलाईट भारताने आताच उद्ध्वस्त केला. सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन.

तथ्य पडताळणी

गुरुवारच्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर मिशन शक्तीबद्दल बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. काही प्रमुख वर्तमानपत्रांतील बातम्यांनुसार, भारताने काल केवळ उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या मोहिमेचा उद्देश हेरगिरी करणारा उपग्रह पाडण्याचा नव्हता तर, अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचा होता.

दैनिक लोकसत्तानुसार, या चाचणीमध्ये भारताने आपलाच एक नमुना उपग्रह पाडला. म्हणजे तो उपग्रह इतर देशाने भारतावर हेरगिरी करण्यासाठी पाठवलेला नव्हता. तो भारताचाच एक उपग्रह होता जो अँटी-सॅटेलाईट मिसाईलची (ए-सॅट) चाचणी घेण्यासाठी वापरण्यात आला.

सविस्तर बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी बुधवारी सकाळी एका ट्विट केले होते की, “ते सकाळी 11.45 ते 12 वाजेदरम्यान एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन येणार आहेत.” त्यांनीदेखील आपल्या व्हिडियो संदेशामध्ये हेरगिरी करणारा उपग्रह उद्ध्वस्त केल्याचे म्हटलेले नाही. राज्यसभा टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवर पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले हे संपूर्ण भाषण तुम्ही पाहू शकता.

पत्र व सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) वेबसाईटवर पंतप्रधानांच्या या भाषणाची हिंदी संहिता उपलब्ध आहे. त्यात म्हटले की, थोड्या वेळा पूर्वी भारताने पृथ्वीलगतच्या ध्रुवीय कक्षेतील (लो अर्थ ऑरबिट- LEO) 300 किमी अंतरावरील पूर्वनिर्धारित उपग्रहाचा अचूक वेध घेत नष्ट केला. केवळ तीन मिनिटांमध्ये ही मोहीम फत्ते करण्यात आली.

संपूर्ण भाषण येथे वाचा – पीआयबीअर्काइव्ह

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेदेखील मिशन शक्तीविषयी एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केली आहे. यामध्ये या मोहिमेविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. यातील पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, “मिशन शक्ती” ही केवळ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची एक चाचणी होती. या मोहिमेत वापरण्यात/पाडण्यात आलेले सॅटेलाईट (उपग्रह) भारताचेच होते. दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नामध्येदेखील हेच उत्तर दिलेले आहे.

संपूर्ण प्रेस रिलीज येथे वाचा – परराष्ट्र व्यवहार मंत्रालयअर्काइव्ह

निष्कर्ष

पंतप्रधानांचे भाषण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काढलेल्या प्रेस रिलीजवरून हे सिद्ध होते की, मिशन शक्ती ही केवळ चाचणी होती. यामध्ये भारताचाच एक नमुना उपग्रह पाडण्यात आला. त्यामुळे हेरगिरी करणारा उपग्रह उद्ध्वस्त केल्याचा दावा खोटा आहे.

Avatar

Title:मिशन शक्तीः भारताने खरंच हेरगिरी करणारा सॅटेलाईट उद्ध्वस्त केला? वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False