
नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल वक्तव्य जुने असून आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य नोव्हेंबर 2023 मध्ये केले होते.
काय आहे दावा ?
व्हायरल ग्राफिकमध्ये आदित्य ठाकरेंचा फोटो आणि एबीपी माझाचा लोगो दिसतो. ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच – आमदार आदित्य ठाकरे”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, आदित्य ठाकरेंनी व्हायरल ग्राफिकमधील वक्तव्य 2023 मध्ये केले होते.
एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर 10 डिसेंबर 2023 रोजी व्हायरल वक्तव्य केल्याच्या बातमीची पोस्ट आढळली.
मूळ पोस्ट – फेसबुक
एबीपी माझाच्या या बातमीनुसार, गोरेगावमध्ये युवासेनेकडून ‘स्वेट ऑन स्ट्रीट‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “सरकारकडून (शिंदे सरकार) यंञणेचा गैरवापर होत आहे. हे घटनाबाह्या सरकार असून मुख्यमंत्र्यांनी (माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील. पण घाबरू नका 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच.”
यापूर्वीदेखील भाजपा नेते राधाकृष्ण विखेपाटील यांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवली असेल. पण, हा थोड्या दिवसांचा खेळ आहे. 31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणार.” अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल वक्तव्य जुने आहे. आदित्य ठाकरेंनी “31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच” हे वक्तव्य नोव्हेंबर 2023 मध्ये शिंदे सरकारच्या विरोधात केल होते. ते विद्यमान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविषयी नाही. भ्रामक दाव्यासह जुने वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे जुने वक्तव्य व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Partly False
