हा पुलवामा हल्ल्याचा व्हिडिओ नाही; 2007 साली इराकमधील हा बॉम्बस्फोट आहे – वाचा सत्य

False सामाजिक

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी आत्मघाती कारबॉम्बद्वारे जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून एक जुनी क्लिप पुन्हा शेअर होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2007 साली इराकमध्ये झालेल्या हल्ल्याचा आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल क्लिपमध्ये रस्त्याने जाणाऱ्या सैनिकांच्या ताफ्यावर एक आत्मघाती कारबॉम्ब स्फोट घडवून आणताना दिसते. हा व्हिडिओ पुलवामा हल्ल्याचा असल्याचा दावा केला जात आहे.

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्सची निवड करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ तर 12 वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

टॉम जोन्स नावाच्या युट्यूब अकाउंटवर सर्वात आधी म्हणजे 22 ऑक्टोबर 2007 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. Big Roadside Bomb on American Convoy असे या व्हिडिओचे नाव आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

इतर अनेक युट्यूब अकाउंटवरूनदेखील हा व्हिडिओ वेगवेगळ्या नावाने शेयर करण्यात आलेला आहे. जसे की येथे Truck Bomb म्हणून, तर येथे इराकमधील ताजी मिलिटरी बेस बाहेर 2 सप्टेंबर 2007 रोजी झालेला कार स्फोट म्हणून हा व्हडियो शेयर केलेला आहे. 


हे देखील वाचा:

अभिनंदन यांच्या नावाने पसरविण्यात येणाऱ्या या माहितीत किती तथ्य?

राहुल गांधींनी शहीदांचा योग्य तो सन्मान राखला नाही का?


मॅकक्लॅची न्यूजपेपर नावाच्या वेबसाईटवरील बातमीनुसार, 2 सप्टेंबर 2007 रोजी इराकी सैनिकांच्या ताजी येथील तळाबाहेर एक आत्मघाती कारबॉम्ब हल्ला झाला होता. यामध्ये 2 जवानांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले होते.

तसेच व्हिडिओवर देखील 2 सप्टेंबर 2007 दुपारी सुमारे चारच्या सुमारास हा स्फोट घडल्याचा टाईम स्टॅम्प आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या पुलवामा हल्ल्याचा नाही. हा व्हिडिओ इराकमध्ये 2007 साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा आहे.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये !]

Avatar

Title:हा पुलवामा हल्ल्याचा व्हिडिओ नाही; 2007 साली इराकमधील हा बॉम्बस्फोट आहे – वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False