VIDEO: केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर आकाशात पांढरा घोडा उडताना दिसला का?

False आंतरराष्ट्रीय

दहा दिवस उशीरा का होईना पण मॉन्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला. हवामान खात्याने शनिवारी (आठ जून) मॉन्सूनच्या केरळ आगमनाची अधिकृत घोषणा केली. मॉन्सूनबाबत व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियोमध्ये दावा करण्यात येत आहे की, केरळमध्ये ढगांतून एक पांढरा घोडा उडताना दिसला. या व्हिडियोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

8 जून रोजी शेयर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये 12 सेंकदाची व्हिडियो क्लिप आहे. यामध्ये आकाशात एक घोडासदृश्य आकृती उडताना दिसते. कॅप्शनमध्ये म्हटले की, केरळला पावसाचे आगमन झाले असून आकाशात घोडा पळताना दिसत आहे.

तथ्य पडताळणी

गुगलवर Horse in the sky असे सर्च केल्यावर द प्रॉफेट नावाच्या एका युट्यूब चॅनेलवरील 23 एप्रिलचा एक व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. या व्हिडियोच्या शीर्षकानुसार, हा व्हिडियो इंडोनेशिया देशाची राजधानी जकार्ता येथील आहे. आकाशात उडणाऱ्या घोड्याला पाहून एक व्यक्ती अल्लाहू अकबर असे ओरडताना व्हिडियोमध्ये ऐकू येते.

या व्हिडियोतील एक फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा व्हिडियो एप्रिल महिन्यापासून उपलब्ध असल्याचे दिसून येते. एम. एल. डी चॅनेल या युजरनेसुद्धा वरील व्हिडियो 20 एप्रिलला अपलोड केला होता. त्याने व्हिडियोला Awan Yang Membentuk Kendaraan Buraq Diatas Gedung KPU असे शीर्षक दिले आहे. गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने केलेल्या भाषांतरानुसार याच अर्थ KPU बिल्डिंगवर ढगांमध्ये बुराक (Buraq) अवतरला, असा होतो. बुराक म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र वाहन.

मग आम्ही KPU बिल्डिंग काय आहे याचा शोध घेतला. इंडोनेशियन भाषेत KPU चा लाँग फॉर्म Komisi Pemilihan Umum (KPU) म्हणजेच इंडोनेशियाचा मुख्य निवडणूक आयोग असा अर्थ होतो. KPU बिल्डिंग म्हणजे निवडणुक आयोगाचे मुख्य कार्यालय, जे इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहरात आहे.

युट्यबवर इंडोनेशियन भाषेतून Diatas Gedung KPU (Above the KPU Building) असे सर्च केल्यावर उडणाऱ्या घोड्याचे विविध व्हिडियो समोर येतात. सर्वात आधी हा व्हिडियो 18 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर विविध दावे जोडून हा व्हिडोयो जगभर पसरविला जात आहे.

यापूर्वी सौदी अरेबियामध्ये 2014 साली आकाशात घोडा उडत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. अशा व्हिडियोंची काही सत्यता नसते. व्हिडियो एडिटिंग आणि इफेक्ट्सच्या माध्यमातून असे व्हिडियो तयार केले जातात.

निष्कर्ष

आकाशात उडणारा घोडा दिसणारा व्हिडियो 18 एप्रिल महिन्यापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. केरळमध्ये मान्सून 8 जूनला दाखल झाला. तसेच तो व्हिडियो इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील आहे. त्यामुळे केरळमध्ये उडणारा घोडा दिसल्याचा दावा खोटा आहे.

Avatar

Title:VIDEO: केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर आकाशात पांढरा घोडा उडताना दिसला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False