मुंबई-गोवा तेजस एक्सेप्रेस नाताळानिमित्त सजविण्यात आली नव्हती; हा व्हिडिओ इंग्लंडमधील आहे

False सामाजिक

सोशल मीडियावर विद्युतरोषणाईने सजलेल्या एका रेल्वेचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नाताळानिमित्त मुंबई-गोव्या दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस रेल्वे अशा तऱ्हेने सजविण्यात आली होती. काही जणांनी हाच व्हिडिओ नववर्षानिमित्त करण्यात आलेल्या रोषणाईचा म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, ही रेल्वे भारतातील नाही. 

काय आहे दावा?

रोषणाईने उजळून निघालेल्या रेल्वेचा एक मनमोहक व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, “तेजस एक्स्प्रेस, मुंबई ते गोवा. नाताळ निमित्त दिव्यांची रोषणाई.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

तेजस एक्सप्रेस भारतातील पहिली हाय-स्पीड लक्झरी रेल्वे असून 2017 साली ती सुरू झाली होती. याविषयी माहिती घेतली असता कळाले की, तेजस एक्सप्रेसला डिझेल इंजिन (WDP3A) आहे आणि व्हायरल व्हिडिओतील रेल्वेला वाफेवर चालणारे इंजिन आहे. यावरूनच या व्हिडिओबाबत केला जाणाऱ्या दाव्याच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होते.

म्हणून मग व्हिडिओतील की-फ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून इंग्लंडमधील छायाचित्रकार स्कॉट विल्यम्स यांनी 24 नोव्हेंबर रोजी फेसबुकवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला.

स्कॉट यांनी कॅप्शनमध्ये दिलेल्या माहिती अनुसार, या रेल्वेचे नाव ‘द ट्रेन ऑफ लाईट्स’ आहे. इंग्लंडच्या गुडरिंग्टन-पैग्टंन भागात ही विशेष रेल्वे धावते. ख्रिसमसनिमित्त अशी रोषणाईने नटलेली रेल्वे चालविण्यात येते.

स्टोरीफुल’ वेबसाईटशी बोलताना विल्यम्स यांनी सांगितले होते की, त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला होता. विल्यम्सने याच ट्रेनचा 19 डिसेंबर रोजी फोटो घेतला होता.

मूळ पोस्ट – फेसबुक

ट्रेन ऑफ लाईट्स काय आहे?

दक्षिण इंग्लंडमधील डार्टमाऊथ स्टीम रेल्वे विभागाद्वारे नाताळानिमित्त दरवर्षी वाफेच्या इंजिनची ही विशेष ट्रेन चालविण्यात येते. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणाऱ्या या रेल्वेवर रोषणाई केली जाते.

गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान ही ट्रेन सुरू होती.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, रोषणाई केलेली ही रेल्वे तेजस एक्सप्रेस नाही. ही रेल्वे इंग्लंडमधील ट्रेन ऑफ लाईट्स आहे. चुकीच्या दाव्यासह या विदेशी रेल्वेचा व्हिडिओ भारतातील सांगत शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुंबई-गोवा तेजस एक्सेप्रेस नाताळानिमित्त सजविण्यात आली नव्हती; हा व्हिडिओ इंग्लंडमधील आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply