‘पतंजली’चे बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्समध्ये भरती करण्यात आले का? वाचा सत्य

False सामाजिक

कोरोनावरील प्रभावी उपचारावरून ‘आयुर्वेद वि. अ‍ॅलोपथी’ असे रामदेव बाबा आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांचे सहकारी व ‘पतंजली’ ग्रुपचे चेअरमन बालकृष्ण दवाखान्यात उपचार घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सोबत दावा केला जात आहे की, बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये हॉस्पिटल बेडवर उपचार घेणाऱ्या व्यक्तीला भेटायला रामदेव बाबा आल्याचे दिसते. सोबत म्हटले की, “पतंजलीचे चेरमन बाला कृष्णन यांना कोरोना ची लागण. प्रकृती चिंताजनक असल्याने एम्स मध्ये भरती करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी एलोपती ला नॉनसेन्स आणि कोरोनील हे औषध च कसे मस्त आहे बोलणारे. उधोगपती शेठ लाला रामदेव यांचा खरा चेहरा जगा समोर आला.” 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

बालकृष्ण यांना एम्समध्ये भरती करण्यात आले का, याविषयी शोध घेतला. युट्यूबवर की-वर्ड्सने सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओशी मिळतेजुळता व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ 2019 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

खाली दिलेला व्हिडिओ 27 ऑगस्ट 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता. म्हणजेच हा व्हिडिओ अलिकडचा नाही. तो दीड-दोन वर्षांपूर्वीचा आहे.

मूळ व्हिडिओ येथे पाहा – युट्यूबयुट्यूब

‘अमर उजाल’ने 24 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, अचानक तब्येत बिघाडल्यामुळे बालकृष्ण यांना ऋषीकेश येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्यांना त्वरीत उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. 

अमर उजालाच्या बातमीचा स्क्रीनशॉट

यानंतर आम्हाला रामदेव बाबा त्यांना भेटायला गेल्याचाही व्हिडिओ आढळला. रामदेव यांनी पत्रकारांशी संवाद साधून बालकृष्ण यांच्या तब्येतीची माहिती दिली. 

“जन्माष्टमीचा प्रसाद खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनंतर बालकृष्ण यांची तब्येत ढासळली. कोणी तरी हे मुद्दाम केले, असे आम्हाला वाटत नाही,” असे रामदेव म्हणाले.

कोरोना व्हायरस सर्वप्रथम डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान शहारात आढळला होता. भारतामध्ये 30 जानेवारी 2020 रोजी पहिली कोरोना केस सापडल्याची नोंद आहे. म्हणजेच हा व्हिडिओ कोरोना पसरण्याआधीचा आहे. 

निष्कर्ष

‘पंतजली’च्या बालकृष्ण यांना एम्स दवाखान्यात भरती केल्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आताचा म्हणून पसरविला जात आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘पतंजली’चे बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्समध्ये भरती करण्यात आले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False