दरड कोसळण्याचा तो व्हिडिओ ना परशुराम घाटाचा, ना अनमोड घाटाचा, ना राजापुरचा; तो तर आसामचा व्हिडिओ

False नैसर्गिक आपत्ती

पावसाळा सुरू होताच पूर आणि दरड कोसळण्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागतात. असाच व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कोकणातील राजापुरमधील रानतळे येथे दरड कोसळण्याचा हा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ राजापूर येथील नाही. तो व्हिडिओ आसाममधील आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये दरड कोसळताना दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “राजापूर रानतळे येथे दरड कोसळली.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ खरंच राजापूर (जि. रत्नागिरी) येथील आहे का याचा शोध घेतला. कोणत्याही दैनिकाने किंवा वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ राजापूर येथील असल्याचे म्हटल्याचे आढळले नाही. 

फॅक्ट क्रेसेंडोने मग राजापुरच्या नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, हा व्हिडिओ राजापूर येथील नाही.

“दरड कोसळण्याचा तो व्हायरल व्हिडिओ आमच्या भागातील नाही. विभागाच्या इंजिनिअरने रानतळे येथील जाऊन खात्री केली की, त्या ठिकाणी अशी कोणतीच घटना घडलेली नाही,” असे दीपाली पंडित यांनी सांगितले.

यासंदर्भात त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला एक व्हिडिओ संदेशदेखील पाठवला.


ALSO READ: जम्मू काश्मीरमधील दरड कोसळण्याचा व्हिडिओ माळशेज घाटाच्या नावाने व्हायरल


सोशल मीडियावर अफवा आणि चुकीच्या पोस्ट न शेअर करण्याच त्यांनी आवाहन केले. 

“अफवांवर लगेच विश्वास न ठेवता जवळच्या ग्रामपंचायत, तलाठी, किंवा तहसीलदार अशा सबंधित विभागाशी संपर्क करून व्हायरल पोस्टची खात्री करून घ्या. अन्यथा फेक न्यूजद्वारे अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल,” असा पंडित यांनी इशार दिला.

UPDATE: हा व्हिडिओ परशुराम घाटातीलही नाही

दरड कोसळण्याचा हा व्हायरल व्हिडिओ मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील म्हणून व्हायरल होत आहे. कोकणातील परशुराम घाटात 4 जुलै रोजी दरड कोसळली होती. परंतु, बातम्यांमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, परशुराम घाटात जोरदार पावसामुळे रात्रीच्या वेळी दरड कोसळली होती. अधिक वृत्त येथे वाचा.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिवसा काढण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ किमान दोन आठवडे जुना आहे. त्यामुळे तो परशुराम घाटातील असण्याचा संबंध नाही.

हा व्हिडिओ अनमोड घाटातीलसुद्धा नाही 

हाच व्हिडिओ गोव्यातील गोवा-कर्नाटक मार्गावरील अनोड घाटाच्या नावानेही व्हायरल होत आहे. 4 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे अनमोड घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. व्हायरल व्हिडिओ याआधीपासूनच इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे तो अनमोड घाटात काढलेला असणे शक्य नाही. 

अनमोड घाटातील मूळ व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. 

हा व्हिडिओ माळशेज घाटातीलही नाही

हा व्हिडिओ जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटातील म्हणूनही शेअर केला जात आहे. परंतु, महाराष्ट्र टाईम्सने या व्हिडिओबाबत स्थानिकांकडून माहिती घेतली असता हा व्हिडिओ तेथील नसल्याचे समोर आले. 

मग हा व्हिडिओ कुठला?

23 जूनपासून हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आसाममधील सिलचर-मिझोरम राष्ट्रीय महामार्गावरील असल्याचे म्हटले आहे. 

इंडिया टुडे ग्रपुच्या तक न्यूजने युट्यूबवर हा व्हिडिओ शेअर करून तो आसाममधील असल्याचे म्हटलेले आहे. 

https://youtube.com/shorts/wJVIDoDALKE?feature=share

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, तेथील 28 जिल्ह्यामध्ये 22 लाख नागरिक पूरग्रस्त आहेत. कच्छर जिल्ह्यामधील सिलचरमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे व अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. आसाममध्ये अद्याप पूरामुळे मृतांचा आकडा 126 वर पोहोचला आहे. 


ALSO READ: महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटातील पूराचा व्हिडिओ विविध घाटांच्या नावाने व्हायरल


निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, आसाममधील दरड कोसळ्याचा व्हिडिओ राजापुरच्या नावाने व्हायरल होत आहे. त्यामुळे ही व्हायरल पोस्ट असत्य ठरते. पूर आणि दरड कोसळण्याच्या व्हायरल व्हिडिओंचे आम्ही केलेले इतर फॅक्ट-चेक येथे वाचा.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दरड कोसळण्याचा तो व्हिडिओ ना परशुराम घाटाचा, ना अनमोड घाटाचा, ना राजापुरचा; तो तर आसामचा व्हिडिओ

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False