माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

False राष्ट्रीय

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशी घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे लोक काळजीपोटी हा व्हिडियो जास्तीतजास्त पसरवून या मार्गावरून जाणाऱ्यांना सूचित करीत आहेत. परंतु, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडियो माळशेज घाटातील नाहीच. ते कसं? त्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोचे हे फॅक्ट चेक वाचा.

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवर पसरत असलेल्या या 14 सेंकदाच्या व्हिडियो क्लिपमध्ये डोंगरावरून मोठमोठे दगड कोसळताना दिसतात. दूर रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत. पोस्टमध्ये लिहिले की, “माळशेज घाटातील हे दृश्य. येथू प्रवास करू नये. सर्व ग्रुपमध्ये पाठवा.” फेसबुवक मोठ्या प्रमाणात ही क्लिप शेयर केली जात आहे.

तथ्य पडताळणी

कल्याण नगर महामार्गवर असणारा माळशेज घाट एक लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळ आहे. तेथे जर व्हिडियोमध्ये ज्याप्रमाणे दिसते तशी दरड कोसळत असेल तर हा बातमीचा विषय आहे. त्यामुळे इंटरनेटवर अशी काही घटना घडली का याचा शोध घेतला. यासंदर्भात कोणतेही माहिती मिळाली नाही. तसेच स्थानिकांना विचारणा केली असता त्यांनीदेखील माहिती नसल्याचे सांगितले.

व्हिडियोची सत्यता तपासण्यासाठी की-फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. फेसबुकवर डेली एक्सेलसिएर नावाच्या वृत्तस्थळाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेयर करण्यात आलेला एक व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

या व्हिडियोनुसार हा व्हिडियो जम्मू-काश्मीरमधील पंथियाल येथील आहे. हा धागा पकडून शोध घेतला असता ग्रेटर काश्मीर वेबसाईटवरील बातमी सापडली. त्यानुसार, रामबान जिल्ह्यातील पंथियाल, डिगदूल आणि केला येथे रविवारी 28 जुलै रोजी दरड कोसळत असल्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला. अमरनाथ यात्रेवरदेखील याचा परिणाम झाला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – ग्रेटर जम्मू काश्मीर

द ट्रीब्युननेदेखील ही बातमी दिली असून सोबत व्हिडियोदेखील दिला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. हा 58 सेंकदाचा व्हिडियो आहे. सोबत दिलेल्या बातमीनुसार, या महामार्गावरील सर्वप्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. अमरनाथ यात्रेचे ट्राफिक, पावसाचा जोर आणि कोसळत असलेले दगड यामुळे सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला.

निष्कर्ष

माळशेज घाटात दरड कोसळत असल्याचा व्हिडियो म्हणून पसरविली जाणारी क्लिप मूळात जम्मू-काश्मीरमधील आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर पंथियाल येथे 28 जुलै रोजी दरड कोसळण्याचा हा व्हिडियो आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False