
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गातील जालना-नांदेड दरम्यानचा भाग रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून एकनाथ शिंदेंनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला, असा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणी कळाले की, टीव्ही-9 मराठीच्या बातमीचा हा स्क्रीनशॉट एडिट केलेला आहे. टीव्ही-9 मराठीने अशाप्रकारची बातमी दिलेली नाही.
काय आहे दावा?
टीव्ही-9 मराठी वाहिनीचा लोगो आणि एकनाथ शिंदेंचा फोटो असणाऱ्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलेले आहे की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पहिला मोठा निर्णय – समृद्धी महामार्ग जोडणारा जालना-नांदेड महामार्ग रद्द.”

मूळ पोस्ट – फेसबुक । फेसुबक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
एकनाथ शिंदे किंवा राज्यसरकारने जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला, अशी अधिकृत माहिती कोणत्याही वृत्तमाध्यमाने दिलेली नाही. तसेच राज्यसरकारच्या वेबसाईटवरदेखील असा निर्णय झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
टीव्ही-9 मराठीच्या वेबसाईटवर आणि युट्यूब चॅनेलवरदेखील एकनाथ शिंदेंनी असा निर्णय घेतल्याची बातमी मिळाली नाही. स्क्रीनशॉटमधील इतर माहितीच्या आधारे शोध घेतला असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आढळला.
खाली दिलेल्या टीव्ही-9 मराठीच्या बातमीच्या स्क्रीनशॉटमध्ये स्पष्ट दिसते की, व्हायरल फोटोतील फाँट आणि मूळ फाँट यामध्ये तफावत आहे.

मूळ पत्रकार परिषद – युट्युब
सदरील स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर टीव्ही-9 मराठीने ट्विटद्वारे खुलासा केला की, टीव्ही-9 वाहिनीच्या नावाने फेक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. टीव्ही-9 मराठीतर्फे स्पष्ट करण्यात आले की, “टीव्ही-9 मराठीच्या ब्रेकिंगचा स्क्रीनशॉट एडिट करुन काही असमाजिक तत्त्वांकडून व्हायरल केला जात आहे, अशाप्रकारची बातमी टीव्ही-9 मराठीने दिलेली नाही. तथापी यामध्ये कुठलंही तथ्य नाही.”
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द झाल्याचा दावा खोटा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा निर्णय घेतलेला नाही. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या बातमीचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

Title:फेक न्यूजः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
