FACT CHECK : लोकमतचे चेयरमन विजय दर्डा यांच्या निधनाची खोटी बातमी होतेय व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

लोकमत समुहाचे चेयरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांचे निधन झाले, अशी पोस्ट सोशल मीडियावर पसरविली जात आहेत. आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत त्यांचे निधन झाल्याचे यामध्ये म्हटले आहे. ही पोस्ट मात्र खोटी असल्याचे निष्पन्न झाले. वाचा काय आहे सत्य.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये विजय दर्डा आणि आयबीएन लोकमतच्या कार्यालयाला लागलेल्या कथित आगीचे फोटो दिले आहेत. सोबत लिहिले की, आयबीएन लोकमतच्या कार्यालयाला भीषण आग. या आगीत होरपळून लोकमतचे मालक विजय दर्डा यांचा मृत्यू.  इतर पोस्टमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेकांनी या पोस्टला खरं मानून शेयर आणि त्याखाली श्रद्धांजलीच्या कमेंट्सदेखील केल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या आगीच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून एबीपी न्यूजवरील बातमीत खाली दिलेले फोटो आढळले. मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. हे फोटो या आगीचे आहेत. म्हणजे दोन वर्षे जुने असून, आयबीएन लोकमतच्या कार्यालयाला लागलेल्या आगीचे नाही.

मूळ बातमी येथे वाचा – एबीपी न्यूजअर्काइव्ह

आम्ही आयबीएन लोकमतच्या (आता न्यूज18 लोकमत) कार्यालयाशीदेखील संपर्क साधला. त्यांनीदेखील ऑफिसला लागल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले.

मग आम्ही लोकमत समुहाचे चेयरमन विजय दर्डा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी फेसबुक पोस्टमधील वृत्त खोटं असल्याचे सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोला दिलेल्या अधिकृत पत्रामध्ये ते म्हणाले की, माझी तब्येत एकदम ठणठणीत असून, माझ्याविषयी खोडसाळ पद्धतीने अफवा पसरविण्यात येत आहेत.

ते पत्र तुम्ही खाली वाचू शकता.

निष्कर्ष

सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याप्रमाणे आयबीएन-लोकमतच्या कार्यालयाला आग लागलेली नाही. तसेच यामध्ये लोकमतचे चेयरमन विजय दर्डा यांचे निधन झाल्याचे वृत्तदेखील खोटे आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK : लोकमतचे चेयरमन विजय दर्डा यांच्या मृत्युची खोटी बातमी होतेय व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False