
राज्यात मुसळधार पावसामुळे धो-धो धबधबे वाहू लागले आहेत. घाटांमध्ये तर दरड कोसळे, रस्ते खचणे अशा घटना घडत आहेत. अशाच एका जलमय घाटात वाहतूक ठप्प झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा एकच व्हिडिओ वेगवेगळ्या घाटांच्या नावे शेअर केला जात आहे. कुंभार्ली घाट, आंबेनळी घाट, मामा भांजे घाट, कात्रज घाट, आंबोल घाट, आंबा घाट, वरंधा घाट, गिरगरधन घाट, कसारा घाट, कन्नड घाट, माळशेज घाट अशा एका ना अनेक घाटांच्या नावे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटाचा आहे.
कोणता व्हिडिओ आहे?
डोंगरमाध्यावरुन पाण्याचा लोंढा घाटातील रस्त्यावर आल्याने दोन्हीकडील वाहतूक खोळंबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
येथे माळशेज घाट म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.
हाच व्हिडिओ कुंभार्ली घाट म्हणूनही शेअर केलेला आहे.
वरंध घाट म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटातील व्हिडिओ म्हणूनदेखील ही क्लिप शेअर करण्यात आलेली आहे.
तथ्य पडताळणी
कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर एबीपी माझाने आंबेनली घाटात पाण्याचे लोंढा वाहू लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याची बातमी देताना हा व्हिडिओ वापरल्याचे आढळले.
हा धागा पकडून फॅक्ट क्रेसेंडोने महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. आंबेनळी चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग पावरा यांनी सदरील व्हायरल व्हिडिओ पाहून तो आंबेनळी घाटातील असल्याचे कन्फर्म केले. घटनास्थळी ते स्वतः उपस्थित होते.
एवढेच नाही तर या घाटात पाणी वाहत असतानाचा त्यांनी त्यांच्या मोबाईमध्ये चित्रित केलेला व्हिडिओसुद्धा फॅक्ट क्रेसेंडोला पाठविला. व्हिडिओच्या मेटाडेटाने हे कन्फर्म झाले की, हा व्हिडिओ त्यांनी 22 जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास शूट केला होता.
पावरा यांनी सांगितले की, 22 जुलै रोजी महाबळेश्वर परिसरात विक्रमी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे महाबळेश्वरपासून 12-15 किमी अंतरावरील आंबेनळी घाटात पाण्यामुळे वाहतूक बंद करावी लागली.
रस्त्याच्याकडेला निळे-पिवळे प्लास्टिक असणारे ते मक्याचे कणसं विकणाऱ्याचे दुकान होते. पावसाळ्यात या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते.
व्हायरल व्हिडिओ आणि पावरा यांनी पाठवलेला व्हिडिओ दोन्हीमध्ये रस्त्याच्याकडेला ते निळ्या-पिवळ्या रंगाचे दुकान दिसते. पावरा यांनी आम्हाला या घाटाचे फोटोदेखील पाठवले.

एआयएम मीडिया नामक वेबपोर्टल फेसबुक पेजवर महाबळेश्वर परिसरातील पावसासंबंधी अनेक ग्राउंड रिपोर्ट आढळले. एवढेच नाही तर आंबेनळी घाटातील रस्ता सुमारे 500 फुट खचला, असा व्हिडिओदेखील या पेजवर पाहायला मिळाला.
फॅक्ट क्रेसेंडोने वेबपोर्टलचे पत्रकार इम्तियाज मुजावर आणि वसिम शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-पोलादपूर हा रस्ताच वाहून गेला. या रस्त्यावरच आंबेनळी घाट आहे.
साताऱ्याच्या वाई विभागातील पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी मुजावर आणि शेख तेथे उपस्थित होते. त्यांनी तेव्हा काढलेले व्हिडिओ आम्हाला पाठवले. घाटात किती मोठे नुकसान झाले या व्हिडिओमध्ये दिसते. पोलिसांबरोबर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी पाहणी केली.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, अतिवृष्टीमुळे जलमय झालेल्या घाटाचा तो व्हायरल व्हिडिओ महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटातील आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कुंभार्ली घाट? आंबेनळी घाट? कन्नड घाट? जलमय झालेल्या घाटाचा तो व्हिडिओ कुठला?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
