FAKE NEWS: अमेरिकेने शिवाजी महाराजांचा फोटो 100 डॉलरच्या नोटेवर छापला का?

False आंतरराष्ट्रीय

अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) ‘जागतिक छत्रपती दिन’ म्हणून घोषित केले, असा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर अमेरिकेतील शंभर डॉलरवर शिवाजी महाराजांचा फोटो असणारी एक नोटसुद्धा व्हायरल मेसेजमध्ये दिलेली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. ही नोट बनावट असून, अमिरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) ‘जागतिक छत्रपती दिन’ म्हणून घोषित केलेले नाही.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सत्य 1 –  अमेरिकेने ‘जागतिक छत्रपती दिन’ घोषित केलेला नाही.

अमेरिकेत एखादा दिन घोषित करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला देण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोड ऑफ रेग्युलेशन 19.4 नुसार, अमेरिकेत विशेष दिन अथवा कार्यक्रम घोषित करण्यात येतो. 

एखादा तारखेला विशेष दिन घोषित करण्याचा प्रस्ताव त्या तारखेच्या किमान 60 दिवसांच्या आधी व्हाईट हाऊसमधील मेनेजमेंट व बजेट ऑफिसच्या संचालकांकडे पाठवावा लागतो. मग तो प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला जातो. राष्ट्राध्यक्षांच्या सहीनंतर त्याची घोषणा करण्यात येते.

अमेरिकेत साजरे केले जाणारे दिवस कोणते याचा शोध घेतला असता त्या यादीमध्ये शिवाजी महाराजांचे नाव नाही. अमेरिकेत शिवाजी महाराजांच्या नावे कोणताही दिवस साजरा केला जात नाही. 

संयुक्त राष्ट्रातर्फे (UN) जागतिक दिन घोषित करण्यात येतात. प्रत्येक देश आपापल्या देशातील दिन निवडू शकतो. त्यामुळे अमेरिकेने जागितक दिन घोषित केला, असे म्हणने चूकीचे ठरते.


ALSO READ

अमेरिकेने महात्मा बसवेश्वारांचा गौरव करण्यासाठी 100 डॉलरवर त्यांचा फोटो छापला का? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेल्या 100 डॉलरच्या नोटेची सत्यता काय?


सत्य 2 – शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारी शंभर डॉलरची नोट बनावट

100 डॉलरच्या नोटेवर तुम्हीसुद्धा तुमचा फोटो टाकू शकता. FAKE Personalized 100 Dollar Bill असे गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला असे अनेक ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला हवा तो फोटो 100 डॉलरच्या नोटेवर एडिट करून टाकता येतो. 

विशेष म्हणजे सगळ्या नोटांवर एकच नंबर (CL 01985909B) येतो. केवळ फोटो बदलतो. याची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत.

अमेरिकेतील चलनी नोटा आणि नाण्यांची डिझाईन आणि निर्मितीची जबाबदारी एनग्रेविंग आणि प्रिंटिंग ब्युरोकडे (BEP) आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागांतर्गत हा विभाग येतो. त्यांच्या वेबसाईटवर अमेरिकेत चलनात असलेल्या 1 डॉलरपासून ते 100 डॉलरपर्यंतच्या नोटांची सविस्तर माहिती दिलेली आहे. 

अमेरिकेत 14 जुलै 1969 पासून 100 डॉलरपेक्षा जास्त किंमतीच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 100 डॉलरची नोट अमेरिकेतील सर्वाधिक किंमतीची नोट आहे.

वेबसाईटवरील माहितीनुसार, अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली. त्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते.

त्यानंतर 1929, 1990, 1996 आणि 2013 साली नोटेच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. परंतु, नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आला.

निष्कर्ष

अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) ‘जागतिक छत्रपती दिन’ म्हणून घोषित केलेला नाही. तसेच, शंभर डॉलर्सच्या नोटेवरदेखील शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अमेरिकेने शिवाजी महाराजांचा फोटो 100 डॉलरच्या नोटेवर छापला का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False