अमेरिकेने महात्मा बसवेश्वारांचा गौरव करण्यासाठी 100 डॉलरवर त्यांचा फोटो छापला का? वाचा सत्य

False सामाजिक
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

अमेरिकेच्या शंभर डॉलरच्या नोटेवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा असणाऱ्या एका कथित नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल घेत अमेरिकेने शंभर डॉलरच्या नोटेवर बसवेश्वरांचा फोटो छापला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी अंत कळाले की, हा बनावट फोटो आहे. अमेरिकेने बसवेश्वरांची प्रतिमा असणारी नोट चलनात आणलेली नाही.

काय  आहे दावा?

बसवेश्वरांचा फोटो असणारी नोट शेअर करून म्हटले की, भारत देशात एकूण ४ महात्मा आहेत, त्यापैकी एक बाराव्या शतकातील महान युगपुरुष समतेचे जनक क्रांतिसूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची त्यांच्या महान कार्याची दखल घेऊन जगातील आर्थिक दृष्ट्या सबल असलेल्या अमेरिकेने महात्मा बसवेश्वर यांची शंभर डॉलरच्या नोटेवर प्रतिमा प्रस्थापित करून भारत देशाचा गौरव वाढवला. आता अमेरिकेत प्रत्येक शंभर डॉलर वर दिसणार भारतातील क्रतीसुर्य महात्मा बसवेश्वर.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

गेल्या वर्षी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असणाऱ्या नोटादेखील व्हायरल झाल्या होत्या. फॅक्ट क्रेसेंडो मराठीने त्यांचे सत्य समोर आणले होते.

अमेरिकेतील चलनी नोटा आणि नाण्यांची डिझाईन आणि निर्मितीची जबाबदारी एनग्रेविंग आणि प्रिंटिंग ब्युरोकडे (BEP) आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागांतर्गत हा विभाग येतो. त्यांच्या वेबसाईटवर अमेरिकेत चलनात असलेल्या 1 डॉलरपासून ते 100 डॉलरपर्यंतच्या नोटांची सविस्तर माहिती दिलेली आहे. 

अमेरिकेत 14 जुलै 1969 पासून 100 डॉलरपेक्षा जास्त किंमतीच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 100 डॉलरची नोट अमेरिकेतील सर्वाधिक किंमतीची नोट आहे.

वेबसाईटवरील माहितीनुसार, अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली. त्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते.

त्यानंतर 1929, 1990, 1996 आणि 2013 साली नोटेच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. परंतु, नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आला.

मग 100 डॉलरच्या नोटेवर महात्मा बसवेश्वरांचा फोटो कसा?

100 डॉलरच्या नोटेवर तुम्हीसुद्धा तुमचा फोटो टाकू शकता. FAKE Personalized 100 Dollar Bill असे गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला असे अनेक ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला हवा तो फोटो 100 डॉलरच्या नोटेवर एडिट करून टाकता येतो. 

विशेष म्हणजे सगळ्या नोटांवर एकच नंबर (CL 01985909B) येतो. केवळ फोटो बदलतो. याची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत.

निष्कर्ष

अमेरिकेने 2013 नंतर शंभर डॉलरच्या नोटेमध्ये बदल केलेला नाही. त्यावर बेंजमिन फ्रँकलिन याचा फोटो आहे. त्यामुळे अमेरिकेने महात्मा बसवेश्वरांचा फोटो असेलेली शंभर डॉलरची नोट चलनात आणल्याचा दावा असत्य ठरतो. ही नोट बनावट आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अमेरिकेने महात्मा बसवेश्वारांचा गौरव करण्यासाठी 100 डॉलरवर त्यांचा फोटो छापला का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •