अमेरिकेने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असणारी 100 डॉलरची नोट चलनात आणल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. जे काम भारत सरकार करू शकले नाही, ते अमेरिकेने करून दाखवल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत बाबासाहेबांचा फोटो असणाऱ्या नोटेचे छायाचित्रसुद्धा दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, जो काम भारत नहीं कर पाया, वह काम अमेरिकाने कर दिखाया. अमेरिका के करेंसी पर बाबासाहब आंबेडकर की फोटो. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 300 पेक्षा जास्तवेळा शेयर करण्यात आली आहे. पोस्टखाली काही जणांनी ही पोस्ट असत्य असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अमेरिकेच्या सरकारने असा काही निर्णय घेतला का, याचा शोध घेतला. तेव्हा अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

अमेरिकेतील चलनी नोटा आणि नाण्यांची डिझाईन आणि निर्मितीची जबाबदारी एनग्रेविंग आणि प्रिंटिंग ब्युरोकडे (BEP) आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागांतर्गत हा विभाग येतो. त्यांच्या वेबसाईटवर अमेरिकेत चलनात असलेल्या 1 डॉलरपासून ते 100 डॉलरपर्यंतच्या नोटांची सविस्तर माहिती दिलेली आहे. अमेरिकेत 14 जुलै 1969 पासून 100 डॉलरपेक्षा जास्त किंमतीच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 100 डॉलरची नोट अमेरिकेतील सर्वाधिक किंमतीची नोट आहे.

वेबसाईटवरील माहितीनुसार, अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली. त्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती राहिलेले बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. 1929 साली या नोटेच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. तेव्हापासून थोड्याफार बदलांसह 1990 पर्यंत ही नोट चलनात होती. याविषयी अधिक येथे वाचा – 100 डॉलर नोट (1914-1990)

त्यानंतर 1990, 1996 आणि 2013 साली नोटेच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. परंतु, नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आला. 2013 पासून सध्या चलनात असलेल्या नोटेवर तोच आहे.

मग बाबासाहेबांचा फोटो असलेल्या नोटेचे काय?

1996 ते 2013 दरम्यान चलनात असलेल्या नोटेशी सोशल मीडियावरील बाबासाहेबांच्या नोटेची तुलना करू. तेव्हा असे लक्षात येते की, मूळ नोटेला फोटोशॉप करून बेंजमिन फ्रँकलिन यांच्या जागी बाबासाहेबांचा फोटो लावण्यात आला आहे.

निष्कर्ष

अमेरिकेने 2013 नंतर शंभर डॉलरच्या नोटेमध्ये बदल केलेला नाही. त्यावर बेंजमिन फ्रँकलिन याचा फोटो आहे. त्यामुळे अमेरिकेने बाबासाहेबांचा फोटो असेलेली शंभर डॉलरची नोट चलनात आणल्याचा दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:100 DOLLAR FACT: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेल्या 100 डॉलरच्या नोटेची सत्यता काय?

Fact Check By: Mayur Deokar

Result: False