
लखनौ येथे पुजा आणि मानसी नावाच्या दोन महिला बुरखा घालून सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात धरणे देणाऱ्या महिलांमध्ये शिरल्या आणि त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंब्रा बुलंद नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंच अशी घटना घडली आहे का, हा व्हिडिओ त्याच घटनेचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
लखनौमध्ये खरोखरच अशी काही घटना घडली आहे का याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी युट्यूबवर 22 नोव्हेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत या मुलींचे नाव पूजा आणि मानसी गुप्ता असल्याचे म्हटले आहे. त्या सख्ख्या बहिणी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. बुरखा का घातला, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत.
त्यानंतर आम्हाला पत्रिका या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार या युवती बुरखा घालून स्थानिक निवडणुकीत बोगस मतदानाचा प्रयत्न करत होत्या. याला विभागीय दंडाधिकारी असणाऱ्या डॉ. पटेल यांनीही दुजोरा दिला आहे.
पत्रिका संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive
याव्यतिरिक्त प्रभात खबर (संग्रहण) या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त 23 नोव्हेंबर 2017 रोजी दिल्याचे दिसून आले. यातून हे स्पष्ट झाले की हा व्हिडिओ सध्याचा नसून त्याचा सीएए संबंधित आंदोलनाशी कोणताही संबंध नाही.
निष्कर्ष
या व्हिडिओचा सीएए संबंधित आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. हा जुना म्हणजेच 2017 मधील बोगस मतदानाशी संबंधित व्हिडिओ आहे. तो असत्य माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.

Title:लखनौमध्ये हिंदू महिलांनी बुरखा घालून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या का, वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
