Fact Check : स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरले का?

False राजकीय

सर्व दुर्गा माता भक्तांनी ह्या XXXX बाईला BJP आपल्या पक्षातून काढत तो पर्यंत विरोध करा आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या….अशी माहिती राष्ट्रवादी पर्व या पेजवर शेअर करण्यात आली आहे. स्मृती इराणी यांच्या छायाचित्रासह दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी

स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल खरोखरच आपत्तीजनक शब्द वापरले का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही “smriti irani durga speech” असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला भाजपच्या अधिकृत युटूयूब खात्यावरील एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओच्या शीर्षकात जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणावर चर्चा करताना 24 फेब्रुवारी 2016 चे स्मृती इराणी यांचे भाषण असे म्हटले आहे. हा संपुर्ण व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पाहिल्यास 30 मिनिटे 25 व्या सेकंदाला आपण पाहू शकता की स्मृती इराणी लोकसभा अध्यक्षांना संबोधित करताना म्हणत आहेत की, जेएनयूच्या काही विद्यार्थ्यांनी 10 फेब्रुवारी रोजी काही पत्रके वाटली होती. त्या पत्रकात दुर्गा मातेबद्दल जे शब्द वापरले ते मी इथे वाचून दाखवत आहे. हे शब्द उच्चारत असल्याबद्दल दुर्गामातेने मला माफ करावे. त्यानंतर त्यांनी या पत्रकातील मजकूर वाचून दाखवला. स्मृती इराणी यांनी हा मजकूर वाचून दाखवण्यापूर्वी मागितलेली माफी आपण खाली पाहू शकता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि मूळ व्हिडिओची तुलनाही आपण खाली पाहू शकता. 

या कामकाजाचे वृत्त 26 फेब्रुवारी 2016 रोजी  इंडिया टुडेने दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, इराणी यांनी हा मजकूर वाचून दाखवल्यावर विरोधी पक्षांनी यावर गदारोळ केला. त्यानंतर ही वक्तव्ये राज्यसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली. इंटरनेटवर मात्र या कामकाजाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.

निष्कर्ष 

स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल कोणताही आपत्तीजनक शब्द वापरलेला नाही. त्यांनी काही विद्यार्थ्यांनी वाटलेल्या पत्रकातील मजकूर वाचून दाखवला होता. हा मजकूर वाचण्यापूर्वी त्यांनी याबाबत खुलासाही केला होता. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरले का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False