Maharashtra Assembly Election: काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली का?

False राजकीय

पुढील महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जागा वाटपाची बोलणी आणि आकडेवारी जुळवाजुळव आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख यांच्यासह 30 जणांची नावे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोन या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

काँग्रेस पक्षाने खरंच यादी जाहीर केली का याचा गुगलवर शोध घेतला. तेव्हा कळाले की, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 18 सप्टेंबर रोजी मीडियाला माहिती दिली होती, 20 सप्टेंबर रोजी काँग्रेसची पहिल्या 50 उमेदवारांची यादी जाहीर होईल. लोकसत्ता, फर्स्ट पोस्ट, न्यूज-18 लोकमत वेबसाईटवर ही बातमी वाचू शकता. एएनआयनेसुद्धा ट्विट करून ही माहिती दिली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा निर्णय झाला आहे. काँग्रेस 125, राष्ट्रवादी 125 आणि मित्रपक्ष 38 जागांवर लढणार आहेत. आता काँग्रेसची पहिली यादी 20 सप्टेंबरला येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. एबीपी माझा चॅनेलशी 18 सप्टेंबर रोजी बोलताना थोरात म्हणाले होते की, छाननी समितीच्या चार आणि सोनिया गांधी यांच्या अध्येक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक झाली असून, साधरण 20 सप्टेंबरपर्यंत पक्षातर्फे पहिली यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आलेली असून, निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी लढण्याची आमची तयारी झालेली आहे.

याचा अर्थ की, थोरात यांनी 20 सप्टेंबर रोजी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान, बीड येथील सभेदरम्यान शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषित केले. त्यामुळे काँग्रेच्या पहिल्या यादीकडे लक्ष लागले. परंतु, गुगलवर शोध घेऊनही काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेली अधिकृत यादी आढळली नाही.

दरम्यान, सकाळ वृत्तपत्राने 20 सप्टेंबर रोजी “अशी आहे काँग्रेसची पहिली यादी” या शीर्षाकाखाली बातमी दिली. यामध्ये सुत्रांच्या हवाल्याने 30 उमेदवारांची संभाव्य यादी दिली आहे. ही नावे आणि व्हायरल पोस्टमधील नावे वाचल्यावर लक्षात येते की, दोन्ही सारखीच आहेत. ‘सकाळ’ने दिलेल्या संभाव्य यादीलाच सोशल मीडियावर काँग्रेसची अधिकृत यादी म्हणून शेयर केले जात आहे.

मूळ बातमी येथे वाचा – सकाळअर्काइव्ह

काँग्रेसच्या परंपरेनुसार, दिल्ली येथून अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे (AICC) उमेदवारांची यादी सर्वप्रथम जाहीर करण्यात येते. अद्याप AICC ने महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही. काँग्रेस पक्षाची वेबसाईट आणि अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अशी कोणतीही यादी अद्याप नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या पीएने सदरील यादी अनाधिकृत असल्याचे सांगत माहिती दिली की, अद्याप कोणतीही अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा, पक्षातर्फे अधिकृतरीत्या सांगण्यात येईल.

निष्कर्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 22 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांची कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेसची पहिली यादी म्हणून सोशल मीडियावर पसरविली जाणारी 30 जणांची नावे अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे ही पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:Maharashtra Assembly Election: काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False