भारतीय विद्यार्थी नीरव शहा अमेरिकेच्या सैन्यात दाखल झाल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

भारतीयांनी अमेरिकेत जाऊन तेथील विविध पदांवर जाऊन आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आहे. असेच एक उदाहरण म्हणून सध्या नीरव शहा या एका भारतीय मुलाचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे. दावा केला जात आहे की, नीरव शहा अमेरिकेतील सैन्यात भरती झाला आहे. यासाठी अखेरच्या चाचणीतील त्याचे मिलिटरी ड्रीलचे कौशल्य दाखवतानाचा एक व्हिडियो शेयर केला जात आहे. ही ड्रील ट्रेनिंग चाचणी अत्यंत कठीण असल्याचे यामध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमध्ये चार मिनिटांचा एक व्हिडियो शेयर करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुण मुलगा रायफल हातात घेऊन मिलिटरी ड्रील करतो. सोबत कॅप्शन दिली की, हा नीरव शहा आहे. गुजराती जैन समाजातील हा युवक अमेरिकेच्या सैन्यात भरती झाला आहे. निवडीच्या अंतिम ड्रील ट्रेनिंग चाचणीमध्ये बघा त्याने सुंदर सादरीकरण केले.

तथ्य पडताळणी

अमेरिकेच्या सैन्यात अनेक भारतीय आहेत. त्याप्रमाणे नीरव शहा नामक हा तरुण खरंच अमेरिकेतील सैन्यात भरती झाला का याचा शोध घेतला. सर्वप्रथम व्हिडियोतील की-फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातुन युट्युब वरील काही व्हिडियोज् समोर आले.

अलेहांद्रो पॉलिनो नावाच्या एका मुलाने 5 मे 2019 रोजी हा व्हिडियो अपलोड केला होता. यातील माहितीनुसार, सीन सिटी ड्रील टीमतर्फे अलेहांद्रो पॉलिनो या विद्यार्थ्याने वर्ल्ड ड्रील चॅम्पियनशीपमध्ये सहभागी घेतला होता. एकल सादरीकरणामध्ये त्याने पहिला क्रमांक मिळवला होता. त्याने अपलोड केलेला व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

कोण आहे अलेहांद्रो पॉलिनो?

अलेहांद्रो पॉलिनो एक प्रोफेशनल मिलिटरी ड्रील खेळाडू आहे. तो विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवत असतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, तो सिन सिटी ड्रील टीमचा संस्थापक आहे. तो इतरांनासुद्धा ड्रील करण्याचे प्रशिक्षण देतो. ड्रील डायनानिक्स वेबसाईटवर तो लास वेगास शहरातील असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच तो भारतीय नीरव शहा नाही.

वर्ल्ड ड्रील चॅम्पियनशीप काय असते?

हाय स्कूल पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत संपूर्ण अमेरिकेतील विद्यार्थी सहभाग घेतात. विविध गटांत मिलिटरी स्टाईल ड्रील सादर करून विजेता निवडला जातो. ही स्पर्धा अमेरिकेच्या सैन्य भरतीची नसते. ही केवळ कलाकौशल्य दाखविण्याची स्पर्धा आहे, जी दरवर्षी मे महिन्यात डेटॉना बीच, फ्लोरिडा येथे होते. यावर्षी ही स्पर्धा 4 व 5 मे रोजी पार पडली.

या स्पर्धेत अलेहांद्रोच्या एकल सादरीकरणाची त्याच्या मित्रानेसुद्धा एका वेगळ्या अँगलने व्हिडियो चित्रित केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

अलेहांद्रोचा व्हिडियो युवराज अनुससिंग वाघेला या मुलाच्या नावानेसुद्धा फिरवला गेला होता. फॅक्ट क्रेसेंडो गुजरातीने त्याचे फॅक्ट चेक केले होते. ते तुम्ही येथे वाचू शकता.

निष्कर्ष

सदरील व्हिडियोतील मुलाचे नाव नीरव शहा नाही आणि तो गुजराती जैन भारतीयसुद्धा नाही. या मुलाचे नाव अलेहांद्रो पॉलिनो आहे. तो अमेरिकन नागरिक आहे. तसेच ड्रील स्पर्धेतून तो सैन्यात भरती झालेला नाही. 

Avatar

Title:भारतीय विद्यार्थी नीरव शहा अमेरिकेच्या सैन्यात दाखल झाल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastysa Deokar 

Result: False