फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो नाही; वाचा सत्य

False सामाजिक

फुले दाम्पत्याने महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुरूषांच्या गुलामगिरीत महिला शतकानुशतके अडकून पडलेल्या आहेत हे लक्षात घेऊन जोतीरावांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली होती. या शाळेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई शिक्षिका होत्या.

पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झालेल्या या शाळेचा दुर्मिळ फोटो म्हणून एक छायाचित्र शेअर केले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेचा नाही. 

काय आहे दावा?

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या फोटोत एका खोलीत लहान मुली बसलेल्या दिसतात. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भिडेवाडयात पुणे येथे सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली पहिली मुलींची शाळा…. स्ञी शिक्षणाला खरी सुरूवात दुर्मिळ असा फोटो’.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर अनेक ठिकाणी हा फोटो आढळला. काहींना हा फोटो फुलेंच्या शाळेचा म्हणून तर इतरांनी हा भारतातील दुर्मिळ फोटो असल्याचे म्हटले आहे. 

फेसबुकवर ‘फोटो अर्काइव्ज ऑफ  पाकिस्तान’ नावाच्या एका पेजवर हाच फोटो आढळला. त्यात म्हटले की, पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील मुलींच्या शाळेचा हा फोटो आहे. 

सोबत या फोटोचा स्रोत ब्रिटिश लायब्ररी असा सांगितला आहे.  

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

हा धागा पकडून मग अधिक शोध घेतला. तेव्हा ब्रिटिश लायब्ररीच्या वेबसाईटवर मूळ फोटो सापडला. 

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुलींच्या शाळेचा हा फोटो 1873 साली काढण्यात आला होता. 

भारतीय पुरातत्व विभागाच्या एका अहवालातून हा फोटो घेतल्याचे म्हटले आहे. मिची अँड कंपनीच्या सौजन्याने हा फोटो उपलब्ध झाला होता. 

मूळ वेबसाईट – ब्रिटिश लायब्ररी | फुल साईज फोटो

मग फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेचा फोटो कोणता?

मराठी विश्वकोषात फुलेंनी भिडेवाड्यात सुरू केलेल्या शाळेचा एक अत्यंत जुना फोटो दिलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

डावीकडून : (१) भिडे वाड्यातील पहिली मुलींची शाळा, (२) हरिजनांसाठी खुली केलेली विहीर व (३) अहिल्याश्रम. (सौजन्यः मराठी विश्वकोष)

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पुण्यातील मुलींच्या पहिल्या शाळेचा हा फोटो नाही. हा फोटो पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मुलींच्या शाळेचा आहे.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Avatar

Title:फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False