
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुलगा नकुलनाथसह सहा जून रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राजशिष्टाचाराचा भाग असणाऱ्या या भेटीचे फोटो ट्विटर, फेसबुकवर शेयर करण्यात आले. सोशल मीडियामध्ये मध्यप्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, ट्विटमध्ये कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या नावासमोर “जी” लावून आदरपूर्वक उल्लेख केला; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावासमोर “जी” लिहिले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्ट?
पोस्टमध्ये मध्यप्रदेश काँग्रसच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या ट्विटचा स्क्रीनशॉट दिला आहे. यामध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, त्यांचा मुलगा खासदार नकुलनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. सोबत लिहिले की, मध्यप्रदेश के मुख्यमंत्री माननीय कमलनाथ जी के साथ छिंदवाड़ा जिले के सांसद नकुलनाथ जी ने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी से सौजन्य भेंट की।
तथ्य पडताळणी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 6 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. फॅक्ट क्रसेंडोने सर्वप्रथम मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (@INCMP) सदरील ट्विटची तपासणी केली. तेव्हा पोस्टमध्ये दिलेले ट्विट आढळले नाही. त्याऐवजी या भेटीचे खालील ट्विट आढळले. यामध्ये नरेंद्र मोदींच्या नावासमोर “जी” लिहिलेले आहे.
कमलनाथ यांच्या ट्विटर हँडलवरदेखील या भेटीचा फोटो शेयर करताना नरेंद्र मोदी यांचा उल्लेख “जी” लावून आदरपूर्वक करण्यात आला. नकुलनाथ यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्टमधील स्क्रीनशॉटप्रमाणे फोटो शेयर करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले की, आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ “जी” यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी “जी” यांची सौजन्य भेट घेतली. यावेळी राज्याचा विकास आणि विविध योजनांविषयी चर्चा झाली. या ट्विटमध्येसुद्धा नरेंद्र मोदी यांचा आदरपुर्वक उल्लेख आहे.
मग आम्ही स्क्रीनशॉटमधील मजकूर जशास तसा गुगलवर सर्च केला. त्यातून मध्यप्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या एका ट्विटची लिंक आढळली. यावर क्लिक केल्यावर कळाले की, हे ट्विट डिलीट केलेले आहे.

डिलीट केलेल्या या ट्विटचे कॅशे (Cached) व्हर्जन मात्र उपलब्ध आहे. ते तुम्ही गुगल सर्चच्या रिझल्ट लिंकसमोर दिलेल्या त्रिकोणी आकराच्या चिन्हावर क्लिक करून पाहू शकता. कॅशे व्हर्जन ट्विटचा स्क्रीनशॉट खाली दिला आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, नरेंद्र मोदींच्या नावा समोर “जी” लिहिलेले नाही. अनेक ट्विटर युजर्सनी यावरून काँग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर टीका केली. टीकेची झोड उठल्यावर हे ट्विट डिलीट करण्यात आले.

डिलीट केलेले हे ट्विट येथे पाहा – गुगल कॅश मेमरी । अर्काइव्ह
निष्कर्ष
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व पुत्र नकुलनाथ यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीसंदर्भात मध्यप्रदेश काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये मोदींच्या नावासमोर “जी” असे आदरपुर्वक वचन लावण्यात आले नव्हते. टीका झाल्यावर हे ट्विट डिलिट करण्यात आले.

Title:मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदींच्या नावासमोर “जी” लिहिलेले नव्हते का?
Fact Check By: Mayur DeokarResult: True
