
कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका रूग्णाची किडनी डॉक्टरांनी काढून घेतल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णाची किडनी काढल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
कोरोनाग्रस्त व्यक्तीची किडनी काढून घेतल्याचा हा व्हिडिओ आहे का, यासाठी शोध घेतला त्यावेळी INDIA NEWZ 2020 या युटूयूब वृत्तवाहिनीवर 6 नोव्हेंबर 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील कोटा शहरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये अपघात गंभीर जखमी झालेल्या बाबूलाल वर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पोटाला पट्टी लावण्यात आल्याने त्यांच्या कुटूंबियांना आणि नातलगांना त्याची किडनी काढण्यात आल्याचा संशय आला. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी बाबूलाल वर्मा यांच्या नातलगांनी केली आहे.
त्यानंतर पत्रिका या संकेतस्थळाने 4 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार मृत बाबूलाल वर्मा यांचे शवविच्छेदन रूग्णालयाने केले आहे. या शवविच्छेदनात बाबूलाल बैरवा यांची किडनी काढून घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रूग्णाचे बिल भरायला लागू नये, यासाठी मृताच्या कुटूंबियांनी हा व्हिडिओ बनविल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सुधा हॉस्पीटलने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या व्हिडिओसोबत किडनी चोरीच्या करण्यात येत असलेल्या आरोपाचे खंडन केले असल्याचेही दिसून आले.
त्यानंतर सुधा हॉस्पीटलच्या संकेतस्थळास भेट दिल्यावर त्याठिकाणी किडनी चोरीच्या आरोपाचे खंडन करणारा व्हिडिओ आणि याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त दिसून आले. फॅक्ट क्रेसेंडोने सुधा हॉस्पीटलच्या स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर सुधा अग्रवाल यांच्याशी याबाबत संपर्क साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, समाजमाध्यमात पसरत असलेली माहिती असत्य आहे. या व्हिडिओतील व्यक्तींनी मास्क घातलेला नाही. या घटनेचा कोरोना विषाणूशी संबंध जोडण्यात आल्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. दोन वर्षापुर्वी काही परिचारिकांनी हा व्हिडिओ बनविला होता. या रूग्णाची क्रैनियोटॉमी करण्यात आली होती. त्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या डोक्यातील हाडाचा काही भाग पोटाजवळ लावण्यात आला होता. त्याचा नंतर मृत्यू झाला. तेथे उपस्थित असणाऱ्यांनी किडनी चोरीचा आरोप लावल्याने या रूग्णाचे शवविच्छेदन करण्यात आले. किडनी चोरीचा आरोप खोटा असल्याचे यातुन सिध्द झाले. आता पुन्हा एकदा मागील दोन-तीन दिवसापासून कोरोनाग्रस्त रूग्णाची किडनी काढल्याच्या खोट्या माहितीसह हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
खाली देण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात या दोन्ही किडनी असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे.
समाजमाध्यमात सुधा हॉस्पीटलबद्दल चुकीची आणि असत्य माहिती पसरत असल्याबद्दल सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रतही आपण खाली पाहू शकता.
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ 2018 मधील राजस्थानमधील एका घटनेचा आहे. याचा कोरोना महामारीशी कोणताही संबंध नाही. या मृत व्यक्तीची किडनीही काढून घेण्यात आलेली नाही.
निष्कर्ष
कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीची किडनी काढून घेण्यात आल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे.

Title:राजस्थानमधील जुना व्हिडिओ कोरोनाग्रस्ताची किडनी काढण्यात आल्याचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
