प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांच्या निधनाची जुनी बातमी व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय | Political सामाजिक

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांचे नुकतेच निधन झाल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. दोन्ही वैज्ञानिकांच्या फोटोसह मेसेज लिहिलेला आहे की, “जर एखादा राजकारणी मरण पावला असता तर प्रत्येकजण रडला असता. पण आपल्या दैशाच्या वैज्ञानिकांचा मृत्यू झाला तरी कोणालाही काळजी नाही.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट चुकीची आढळली.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

डॉ. यू. आर. राव यांना भारतीय उपग्रह मोहिमेचे जनक मानले जाते. भारताने अवकाशात ‘आर्यभट’ नावाचा पहिला उपग्रह पाठवला होता. यामध्ये डॉ. राव यांचा मोठा वाटा होता. देशातील एवढ्या मोठ्या वैज्ञानिकाचा मृत्यू झाल्याची माध्यमांत बातमी कशी आली नाही याचे आश्चर्य वाटते. म्हणून शोध घेतला असता कळाले की, डॉ. राव यांचे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 24 जुलै 2017 रोजी निधन झाले होते. 

द हिंदूसह देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी डॉ. राव यांच्या निधनाची बातमी आली होती. उडुपी रामचंद्र राव असे त्यांचे पूर्ण नाव होते. बंगळुरू येथील घरी त्यांचे वयाच्या 85 व्य वर्षी निधन झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करीत डॉ. राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. 24 जुलै 2017 रोजी त्यांनी ट्विट केले की, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव यांचे भारतीय अवकाश क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे

अर्काइव्ह

विशेष म्हणजे प्रा. यश पाल यांचेदेखील 24 जुलै 2017 रोजी निधन झाले होते. डीडी न्यूजच्या बातमीनुसार, नोएडा येथील एका दवाखान्यात वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अवकाश संशोधनासह त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्येदेखील मोठे बदल घडवून आणले. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) चेयरमनदेखील होते. विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जुलै 2017 रोजी ट्विटरवर प्रा. यश पाल यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते की, प्रा. यश पाल यांच्या निधनामुळे आपण एक उत्तम विज्ञानिष्ठ व्यक्ती गमावला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अजरामर आहे. 

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांचे निधन तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 साली झाले होते. तसेच त्यावेळी त्यांच्या निधनाची योग्य ती दखल घेण्यात आली होती. त्यांच्या निधनाची ही जुनी बातमी अलिकडची म्हणून पुन्ही शेयर केली जात आहे. 

Avatar

Title:प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांच्या निधनाची जुनी बातमी व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False