FACT CHECK: बीएसएनएल खरंच 65 हजार टॉवर रिलायन्सला विकण्याच्या तयारीत आहे का?

False अर्थव्यवस्था

भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीविषयी विविध प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मध्यंतरी बीएसएनएल 54 हजार कर्मचारी काढणार असल्याचीदेखील बातमी आली होती. आता अशी पोस्ट फिरत आहे की, बीएसएनएल रिलायन्सला 65 हजार टॉवर विकण्याच्या तयारीत आहे. एका युजरने आम्हाला या फेसबुक पोस्टची लिंक पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये एका हिंदी वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण दिले आहे. 65 हजार टॉवर रिलायन्स को सौपने की तैयारी! असे बातमीचे शीर्षक आहे. सोबत म्हटले की, भक्तों बेवकुफ बन कर कैसा लगा?

तथ्य पडताळणी

पोस्टमधील बातमी कोणत्या वर्तमानपत्रातील आणि कधी प्रकाशित झाली होती याची माहिती दिलेली नाही. बातमीतील मजकुरदेखील स्पष्ट नाही. या बातमीचा मग आम्ही शोध घेतला.

बातमीच्या कात्रणाला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर 15 डिसेंबर 2016 रोजीचे एक ट्विट मिळाले. हे ट्विट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ट्विटमध्ये या बातमीचे स्पष्टपणे वाचता येणारे कात्रण आहे. आत्माराम सोनी नावाच्या पत्रकाराने भोपाळ येथून ही बातमी दिली होती. बातमीत म्हटले की, केंद्रीय दूरसंचार मंत्रालय बीएसएनएलअंतर्गत असणाऱ्या 65 हजार टॉवरसाठी एक सहाय्यक कंपनी स्थापन करून तिला रिलायन्स जियोला विकण्याच्या तयारीत आहे.

बातमीत ही माहिती कोणी दिली, त्याची सत्यता काय याचा काही पुरावा दिलेला नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग आत्माराम सोनी यांचा शोध घेऊन संपर्क साधला. ही बातमी 2016 मध्ये भोपाळमधील दैनिक सांध्य प्रकाश नावाच्या वृत्तपत्रात छापून आल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. स्थानिक बीएसएनएल कर्मचारी संघटनेतील लोकांनी दिलेल्या माहितीच्या त्यांनी ही बातमी केली होती. त्याला कोणताही अधिकृत दुजोरा नव्हता.

म्हणजे सोशल मीडियावर पसरविली जाणारी ही बातमी तीन वर्षांपूर्वी भोपाळमधील स्थानिक वृत्तपत्र दैनिक सांध्य प्रकाशमध्ये कोणत्याही पुराव्याशिवाय छापून आली होती.

केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात फोरम ऑफ बीएसएनएल युनियन्स/असोसिएशन या कर्मचारी संघटनेने 15 डिसेंबर (2016) रोजी देशव्यापी बंद पुकारल्याचे बातमीत म्हटले आहे.

मग हे कर्मचारी 65 हजार टॉवर रिलायन्स जियोला विकण्याला विरोध करत होते का?

फोरम ऑफ बीएसएनएल युनियन्स/असोसिएशनच्या वेबसाईडवर आम्हाला बीएसएनएलच्या सहाय्यक टॉवर कंपनी स्थापन करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारणारे एक पत्र आढळले. बीएसएनएलचे चेयरमन अनुपम श्रीवास्तव 7 ऑगस्ट 2015 साली लिहिलेल्या या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, बीएसएनएलचे 65 हजार टॉवर वेगळे करून त्याची सहाय्यक कंपनी स्थापन करण्याला आमचा तीव्र विरोध आहे. हा निर्णय बीएसएनएलसाठी नुकसानदायक ठरेल. कंपनीचे खासगीकरण करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे आम्हाला वाटते.

हे पत्र येथे वाचा – फोरमअर्काइव्ह

म्हणजेच सहाय्यक टॉवर कंपनीचा निर्णय बीएसएनएलला खासगीकरणाकडे घेऊन जाणार, अशी  कर्मचारी संघटनांना भीती वाटत होती. बीएसएनएलचे टॉवर रिलायन्सला जियोला विकण्याचे त्यांनी म्हटलेले नाही.

काय आहे सहाय्यक टॉवर कंपनी?

2015 साली, बीएसएनएलचे 65 हजार टॉवर वेगळे करून त्यांची सार्वजनिक सहाय्यक कंपनी (Subsidiary Company) तयार करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विचाराधीन होता. ही कंपनी खासगी नव्हती.

मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक टाईम्सअर्काइव्ह

पुढे 12 सप्टेंबर 2017 रोजी केंद्राने बीएसएनएलचे टॉवर वेगळे करून एक वेगळी कंपनी स्थापन करण्याची मंजुरी दिली. ही नवीन कंपनी पूर्णतः बीएसएनएलच्याच ताब्यात राहणार आहे. म्हणजे ती कंपनी रिलायन्स जियोला विकली जाणार नाही.

मूळ आदेश येते वाचा – पीआयबीअर्काइव्ह

द इकोनॉमिक टाईम्सच्या टेलिकॉम पोर्टलने 26 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या एका बातमीत बीएसएनएलचे चेयरमन अनुप श्रीवास्तव यांनी स्वतः टॉवर रिलायन्स जियोला विकण्याचे वृत्त फेटाळले. ते म्हणाले की, एका हिंदी दैनिकात बीएसएनएलचे 65 हजार टॉवर रिलायन्स जियोला विकण्याची छापून आलले बातमी पूर्णतः खोटी आहे.

टेलिकॉम ऑफिसर्स असोसिएशन (टीओए) महासचिव अनिल कुमार तिवारी म्हणाले की, अशा बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. जर बीएसएनएलला मोबाईल टॉवर एखाद्या खासगी कंपनीला विकायचे असते, तर बीएसएनएलने वेगळी कंपनी तयारी केलीच नसती.

मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक टाईम्सअर्काइव्ह

निष्कर्ष

बीएसएनएलचे 65 हजार टॉवर रिलायन्स जियोला विकणार अशी खोटी बातमी पसरविली जात आहे. बीएसएनएल चेयरमननेच या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: बीएसएनएल खरंच 65 हजार टॉवर रिलायन्सला विकण्याच्या तयारीत आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False