Fact Check : जागृती नगर येथे NSG ने मॉक ड्रील घेतली होती

Mixture सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई असल्याचा इशारा गुप्तचरांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई हायअलर्टवर आहे. रविवारी NSG चे कमांडो मुंबईत दाखल झाले. मुंबईतील अतिसंवेदनशील भागाची आणि महत्त्वाच्या संस्थांची पाहणी NSG ने केली. नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असं आवाहनही मुंबई पोलिसांनी केलं आहे, अशी माहिती देणारी पोस्ट Mumbai Live – Marathi या पेजवर आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई असल्याचा इशारा गुप्तचरांनी दिला आहे का? मुंबई हायअलर्टवर आहे? रविवारी NSG चे कमांडो मुंबईत दाखल झाले का? मुंबईतील अतिसंवेदनशील भागाची आणि महत्त्वाच्या संस्थांची पाहणी NSG ने केली का? असे अनेक प्रश्न या पोस्टमुळे निर्माण होतात. त्यामुळे आम्ही याबाबत शोध घेतला. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिल्याचे दिसून आले. या वृत्तात बकरी ईद (दि.12) आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त (दि.15) हा हायअलर्ट जारी केल्याचे म्हटले आहे. या वृत्तात कोणता व्हिडिओ मात्र वापरण्यात आलेला नाही. त्यानंतर आम्ही पोस्टमधील व्हिडिओत जागृती नगर, मुंबई येथील मेट्रो स्टेशन दिसत असल्याने आम्ही याबाबत काही मिळते का याचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला या घटनेविषयी वेगवेगळे दावे दिसून आले. या घटनेचे महत्व आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुंबईतील जनजीवन सुरळित सुरु आहे. मुंबई पोलिसांनी कोणताही हाय अलर्ट जारी केलेला नाही, असे स्पष्ट केले. 

विभागीय पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जागृतीनगर, घाटकोपर येथे रुटीन मॉक ड्रील (नियमित सराव) घेण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होऊ नये, यासाठी ही मॉक ड्रील रात्रीच्या वेळी घेण्यात आली. याठिकाणी कोणताही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. 

निष्कर्ष

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि विभागीय पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांनी आपण कोणताही हाय अलर्ट जारी केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अलर्टसह पसरविण्यात येणारा व्हिडिओ हा जागृतीनगर येथे रात्रीच्या वेळी घेण्यात आलेल्या मॉक ड्रीलचा आहे. त्याचा अलर्टशी संबंध नाही. त्यामुळे या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:Fact Check : जागृती नगर येथे NSG ने मॉक ड्रील घेतली होती

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •